हिंगोली : रस्त्यावर वाढदिवस साजरा करण्याची क्रेझ वाढली असून अप्रत्यक्षपणे दहशतच निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यातून शांतता भंग होऊन इतरांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे आता रस्त्यावर वाढदिवस साजरा केल्याचे आढळल्यास थेट पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले जाणार आहेत.
शहरातील गल्लीबोळात मध्यरात्री आरडाओरड करून डीजेच्या तालावर नाचत वाढदिवस साजरा करण्याची अनेक स्वयंघोषित दादांना हौस असते. अनेकजण तर तलवारीने केक कापून नेतेपणाची हौसही भागवून घेतात. यातून अप्रत्यक्षपणे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, आता रस्त्यावर वाढदिवस साजरा करणे चांगलेच महागात पडणार आहे. रस्त्यावर वाढदिवस साजरा करीत असल्याचे आढळून आल्यास बर्थ डे बॉयसह त्यांच्या मित्रांवरही गुन्हे दाखल केले जाणार आहेत. हिंगोली शहरात रस्त्यावर वाढदिवस साजरा करणाऱ्यांना पोलिसांनी यापूर्वी प्रसाद दिला आहे. यामुळे रस्त्यावर वाढदिवस साजरा करण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी काहीजण पोलिसांना गुंगारा देत वाढदिवस साजरा करीत आहेत. मात्र, आता वाढदिवस साजरा करीत असल्याचे आढळल्यास अशांवर थेट गुन्हे दाखल होणार आहेत.
...तर गुन्हा दाखल
- रस्त्यावर वाहने उभे करून केक कापणे
- तलवारीने केक कापणे
- डीजे - गाणी लावून रस्त्यावर गोंधळ घालणे
- मध्यरात्री फटाके फोडून शांतता भंग करणाऱ्यांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात येतो.
पोलीस निरीक्षकांचा कोट
रात्रीच्या वेळी शांतता भंग होऊ नये तसेच अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी रात्रीच्या वेळी नियमित गस्त सुरू असते. नियमांचे उल्लंघन करून गर्दी जमवून रस्त्यावर वाढदिवस साजरा करू नये, असे प्रकार आढळल्यास वाढदिवसाचे साहित्य जप्त करून अशांवर गुन्हे दाखल केले जातील.
- पंडित कच्छवे, पोलीस निरीक्षक, हिंगोली शहर.
रस्त्यावर दंगा नकोच
शहरातील हिंगोली शहर व हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने रात्री गस्त सुरू असते. त्यात नियंत्रण कक्षात अथवा पोलीस ठाण्यात कोणी कॉल करून तक्रार केल्यासही पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचून कारवाई करतात. त्यामुळे उत्साहाच्या भरात रस्त्यावर वाढदिवस साजरा करणे महागात पडू शकते.