हिंगोली : रेडिओ फ्रिक्वेन्सी मीटरमध्ये छेडछाड करून वीज चोरी करण्याचा प्रयत्न केला ते ‘त्या’ ग्राहकांसाठी महागात पडू शकते. चोरी करण्याचे उघड झाल्यास विजेची चोरी करणाऱ्या ग्राहकाला दंडासोबत जेलची हवाही खावी लागणार आहे, असा इशारा महावितरण कंपनीने दिला आहे.
हिंगोली शहरात महावितरण कंपनीच्या वतीने रेडिओ फ्रिक्वेन्सी मीटर बसविण्यात आले आहेत. सर्व मीटरची रीडिंग ही ‘डीसीयू’मार्फत मुख्य कार्यालय मुंबई येथे प्राप्त होत आहे. त्यामार्फत काही ग्राहक वीज मीटरमध्ये गैरमार्गाने मीटर कव्हर खोलून छेडछाड करणे, न्यूट्रल वायर तोडणे किंवा आर्थिंग कंट्रोल आदी प्रकार कळणार आहेत. असे प्रकार करताना आढळून तर त्यांना दंड आणि शिक्षाही होऊ शकते. सदर वीज चोरीचा प्रकार हा वीज कायदा २००३ कलम १३५ नुसार अजामिनपात्र गुन्हा आहे. अशा वीज चोरी करणाऱ्यांची यादी प्राप्त होत असून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर, अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव, कार्यकारी अभियंता रजनी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरण कंपनीने पथकांची स्थापना केली आहे. डीसीयूमार्फत प्राप्त यादीतील वीज चोरी करणाऱ्यांच्या मीटरची तपासणी करून मीटर जप्ती व वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात सध्या सुरू आहे. वीज चोरी करणाऱ्यांचा वीजपुरवठा दंड भरल्यावरच जोडण्यात येणार आहे. वीज चोरी करणाऱ्यांनी दंड न भरल्यास पोलीस कारवाईही करण्यात येत आहे.
प्रतिक्रिया...
सदर वीज चोरी करतेवेळेस घरातील लहान-थोरांना अपघात होऊन जीवित हानी होऊ शकते. तेव्हा वीज ग्राहकांनी कोणत्याही प्रकारच्या आमिषाला बळी न पडता प्रामाणिकपणे विजेचा वापर करावा. वीज वापरल्यानंतर आपले वीज बिल नियमितपणे भरावे व वीज मंडळास सहकार्य करावे.
- दिनकर पिसे, उपकार्यकारी अभियंता, हिंगोली