लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या विचाराच्या प्रचार आणि प्रसारासाठी स्व.गंगाप्रसादजींनी आपली कारकिर्द पणाला लावली. यामुळेच मराठवाड्याचे गांधी म्हणून त्यांना संबोधले जाते. माझ्यासारखे शेकडो कार्यकर्ते गंगाप्रसादजींची प्रेरणा घेऊन घडले. त्यांच्या विचाराची मशाल तेवत ठेवत युवकांना दीपस्तंभाप्रमाणे या माध्यमाने मार्गदर्शन व्हावे, असे विचार ज्येष्ठ समाजसेवक डॉ.व.द.भाले यांनी व्यक्त केले.ग्रामस्वराज्याच्यी स्वप्नपूर्ती करू इच्छिणाऱ्या व गांधी विचाराने जगणाºया कार्यकर्त्यास ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक डॉ.गंगाप्रसादजी अग्रवाल प्रणित ग्रामस्वराज्य प्रतिष्ठाण वसमतच्या वतीने गंगाप्रसादजींच्या नावे पुरस्कार दिला जातो. यावर्षीचा पुरस्कार डॉ.व.द.भाले यांना देण्यात आला. डॉ.भाले यांचे वय व प्रकृती लक्षात घेऊन त्यांच्या निवासस्थानीच एका छोटेखानी कार्यक्रमात डॉ.भाले व त्यांच्या सुविद्य पत्नी शांताबाई भाले यांचा सत्कार करून सन्मानपत्र देऊन पुरस्कार संस्थेचे अध्यक्ष बालाजी कोंपलवार, अॅड.रामचंद्र बागल, ज्ञानेश्वर मुंढे यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी ते बोलत होते.भाले म्हणाले, मी १९५४ मध्ये गंगाप्रसादजींच्या संपर्कात आलो आणि राष्ट्रसेवादलाची शाखा हिंगोलीत स्थापन केली. त्या माध्यमातून मला जनतेची सेवा घडली. आज महात्मा गांधीजींच्या विचाराची जपवणूक करणे ही काळाची गरज आहे. पूर्वी मधू लिमये, भाई वैद्य, गोविंदभाई श्राफ, अनंत भालेराव, मृणाल गोरे, बापू काळदाते, पन्नालाल सुराणा, रानडे यासारख्या विचारवंतांसोबत मला काम करण्याची संधी मिळाल्याचे सांगून प्रसादजींच्या विचाराची मशाल यापुढे तेवत ठेवण्याचे काम संस्थेच्या माध्यमातून व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.कोंपलवार यांनी यावेळी प्रास्ताविक केले. तर उत्तम दगडू यांनीही यावेळी मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले. तर डॉ.दिलीप भाले यांनी पुरस्कारातून मिळालेल्या ५ हजार रूपयाच्या रकमेत स्वत:ची १० हजारांची रक्कम घालून १५ हजार ग्रामस्वराज्य प्रतिष्ठाणला दिले.यावेळी प्रसिध्द चित्रकार भ.मा.परसवाळे, अॅड.रमेश अंबेकर, ज्ञानेश्वर मुंढे, दादाराव शिंदे, तुकाराम झाडे, प्रकाश इंगोले, विशाल अग्रवाल, डॉ.स्वाती भाले, डॉ.दिलीप भाले आदींची उपस्थिती होती.
भाले यांना पुरस्कार प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 11:59 PM