हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यातील भोसी व नागझरी परिसरात ३१ मे रोजी संध्याकाळी झालेला पाऊस आणि चक्रीवादळामुळे महावितरणच्या विद्युत यंत्रणेलाही जबर फटका बसल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. उच्चदाबाचे ३०, तर लघुदाबाचे २० खांब कोसळले होते. २ जून रोजी पुरवठा पूर्ववत झाला.
अचानक झालेल्या चक्रीवादळामुळे भोसी गावासह नागझरी परिसरातही महावितरणच्या यंत्रणेचे मोठे नुकसान झाले. उच्चदाब विजेचे ३० पोल तर लघुदाब विजेचे २० पोल कोसळले. त्याचबरोबर ८ डीटीसी यंत्रणाही कोसळल्या. त्यामुळे भोसी गावातील १९७ आणि नागझरी गावातील ८७ वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. हिंगोली मंडळाचे अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव तसेच कार्यकारी अभियंता रजनी देशमुख यांनी आवश्यक त्या सूचना देत वीजपुरवठा लवकरात लवकर पूर्ववत करण्यास सांगितले. औंढा उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता अमित गायकी, सहायक अभियंता अश्विनकुमार मेश्राम, तंत्रज्ञ सचिन चव्हाण, प्रधान तंत्रज्ञ सरोजखान पठाण आदींनी कुठे नुकसान झाले आहे, याची तपासणी केली. जास्त हानी न झालेल्या भागातील वाकलेले विजेचे खांब सरळ करण्यात आले. तसेच तुटलेल्या केबल जोडून वीजपुरवठा मंगळवारी दुपारपर्यंत सुरू केला. २ जून रोजीही दिवसभर काम करत कोसळलेले खांब उभे केले. रोहित्रांचीही पुन्हा उभारणी केली. दोन्ही गावांतील जवळपास सर्व ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात महावितरणच्या कर्मचाऱ्यांना यश आले. उर्वरित नागझरी तांड्याचा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी ३ जून रोजीही या भागात महावितरणचे कर्मचारी काम करीत असल्याचे दिसून येत होते.