हिंगोली : जिल्ह्यात अवैध धंदे बंद करण्याच्या मागणीसाठी भाजप आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या नेतृत्वात उपोषण करून पोलिसांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर सेनेचे आमदार संतोष बांगर यांचे नाव न घेता त्यांनीच अवैध धंदे सुरू केल्याचा आरोप आ. मुटकुळे यांनी केला. प्रत्युत्तर देताना बांगर यांनीही भाजपवर तेच आरोप केले. या दोन पक्षांचे नेते एकमेकांवर जोरदार चिखलफेक करीत आहेत.
यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे म्हणाले, अवैध वाळू वाहतूक, अवैध दारू विक्री, मटका जिल्ह्यातील प्रत्येक खेड्यापाड्यात जोमात सुरू झाला आहे. एक पिढी गारद करण्याचे काम लोकांनी निवडून दिलेले आमदारच करीत आहेत. अवैध दारू गावागावात मोटारसायकलवरून पोहोचवत आहेत. शेतकऱ्यांच्या व्यथांच्या संदर्भात, विकासाबाबत हे सरकारमध्ये बसलेले आमदार कधीच बोलत नाहीत. यांचे स्वत:चे आधी हेच धंदे होते. आता आमदार झाल्यावर ते उजळ माथ्याने हे धंदे करू लागले आहेत. बीड शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष कुंडलिक खाडे यांचा गुटखा नुकताच पकडला. तशीच येथे कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी सेनेचे आमदार संतोष बांगर यांचे नाव न घेता आ. मुटकुळे यांनी केली. तर आज वंजारवाडा भागात दररोज पाचशे मोटारसायकली, २० ते २५ जीप उभ्या आहेत. तेथे मटका चालतो. गुटखा विकला जातो. तरीही पोलीस झोपेत आहेत. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही मुटकुळे यांनी केली.
या आंदोलनात भाजप जिल्हाध्यक्ष रामराव वडकुते, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, माजी आ.गजानन घुगे, देशपांडे, फुलाजी शिंदे, मिलिंद यंबल, गणेश बांगर, क्रिश्ना रुहटिया, यशोदा कोरडे, भागोराव राठोड, पप्पू चव्हाण आदी शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.
बनावट दारू, गुटखा विकणारेच उपोषणाला बसलेया आरोपांना प्रत्युत्तर देताना आमदार संतोष बांगर म्हणाले, अवैध वाळू वाहतूक करणारे, बनावट दारू विकणारे, प्लॉटवर कब्जा करणारे, गुटखा विकणारेच अवैध धंद्यांविरोधात उपोषणाला बसले आहेत. शिवसेना व आमदार म्हणून मला जनता डोक्यावर घेत असल्याचे यांना सहन होत नाही. त्यामुळे असे बिनबुडाचे आरोप करून मला बदनाम करण्याचा डाव आखत आहेत. कोरोना काळात आम्ही रेमडेसिविर वाटत होतो अन् हे बनावट दारूचा धंदा करीत होते. जनताच यांना पाहून घेईल.