सेनगाव: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी भाजपाचे अशोक ठेंगल तर उपसभापतीपदी काँग्रेसचे मदन इंगोले यांची सोमवारी झालेल्या संचालकांच्या बैठकीत बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर त्यांचा सत्कार करण्यात आला.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांची बाजार समितीच्या सभागृहात आज विशेष सभा पार पडली. बैठकीस सर्व १८ संचालक उपस्थित होते. सभापतीपदाकरीता भाजपाचे तालुकाध्यक्ष अशोक ठेंगल यांचा तर उपसभापतीकरीता काँग्रेसचे मदन इंगोले यांचा एकमेव अर्ज आल्याने सभापतीपदी ठेंगल तर उपसभापतीपदी इंगोले यांची बिनविरोध निवड जाहीर झाली. या बैठकीला संचालक अशोक ठेंगल, मदन इंगोले, संजय देशमुख, चंद्रकांत हराळ, भास्कर पाटील, पुरुषोत्तम गडदे, संतोष देवकर, नथुजी कावरखे, नारायण सावके, अंकुश तिडके, वैभव देशमुख, विजय तोष्णीवाल, प्रकाश बीडकर, भिकाजी अवचार, छायाताई पोले, दीक्षा नरवाडे, संजिवनी बोर्डे, विकास शिंदे आदी संचालकांची उपस्थिती होती.
भाजप, कॉंग्रेस, ठाकरे गटात समझोता बाजार समितीच्या सभापती, उपसभापतीपदाकरीता भाजप, काँग्रेस व शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांच्या युतीमध्ये राजकीय समझोता झाला. हिंगोली बाजार समितीच्या समिकरणाच्या अनुषंगाने सेनगावात आघाडी करुन सुरुवातीला भाजपला दोन वर्षे सभापतीपद, त्यानंतर काँग्रेसला सभापतीपद तर उर्वरित दोन वर्षे शिवसेनेच्या वाट्याला उपसभापतीपद येणार आहे. उपसभापतीपद हे तिन्ही पक्षांनी प्रत्येकी २० महिने या पद्धतीने विभागून घेतले आहे. राज्यात वरिष्ठ पातळीवर परस्पर विरोधी कट्टर भूमिका घेणारे भाजप-सेना-काँग्रेस सेनगाव बाजार समितीच्या सत्तेकरीता मात्र तत्वनिष्ठा बाजूला ठेवून मांडीला मांडी लावून बसणार आहेत. निर्वाचित पदाधिकाऱ्यांचा या वेळी आमदार तानाजी मुटकुळे, माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर,दिनकरराव देशमुख,द्वारकादास सारडा,अँड. के.के.शिंदे आदी उपस्थितीत होते.