लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : हिंगोली : राजस्थान, छत्तीसगड व मध्य प्रदेशात काँग्रेसने चांगलीच मुसंडी मारली आहे. काँग्रेसमुक्त भारताचे स्वप्न पाहणाºया भाजपाचा या निकालाच्या माध्यमातून मतदारांनी दिलेली चपराक आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे गुजरात राज्याचे प्रभारी तथा हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांनी व्यक्त केली आहे.खा. सातव पुढे म्हणाले, केंद्रातील सरकारने मागील साडेचार वर्षांत जनतेला केवळ आश्वासने दिली आहे. या आश्वासनांचा या सरकारला विसर पडला होता. केंद्रातील सरकार सर्वच आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरले आहे. विधानसभा निवडणुकीतून जनतेने राफेल घोटाळ्याबद्दलचा संताप मतपेटीतून दाखवून दिला. या सरकारने शेतकरीविरोधी धोरणे राबवली आहेत. त्यामुळे जनतेच्या मनात सरकारविरुद्ध असंतोष निर्माण होत असतानाही दुसरीकडे भाजपा सरकार मात्र काँग्रेसमुक्त भारताचे स्वप्न पाहात होता. मात्र त्यांच्या भ्रमाचा भोपळा या निवडणुकीने फोडला आहे.खा. राहुल गांधी यांनी पक्षाची सुत्रे हाती घेतल्यानंतर निवडणुकीसाठी अवलंबलेली रणनीती तसेच काम करणाºया पदाधिकारी, कार्यकर्त्यांना दिलेली संधी यामुळे हे यश मिळाले आहे. आगामी निवडणुकीत काँग्रेस व मित्रपक्ष एकत्रीतपणे पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार आहे. सन २0१९ मध्ये काँग्रेस व मित्रपक्षाचेच सरकार स्थापन होणार आहे,असेही खा. सातव यांनी सांगितले. आगामी निवडणुकीची सेमीफायनल समजल्या जाणाºया मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान या राज्यात काँग्रेसला मिळालेले यश काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. राहुल गांधी यांच्यावर जनतेने टाकलेला विश्वास आहे.