हिंगोली : भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यावर गोळीबार करून फरार झालेल्या दोन आरोपींसह अन्य एकास पोलिसांनी पुणे जिल्ह्यातून ताब्यात घेतले. मंगळवारी सकाळी त्यांना हिंगोलीत आणण्यात आले. मुख्य आरोपीला पकडण्यात आल्याने या प्रकरणांचा गुंता सुटण्यास मदत झाली आहे.
येथील जिल्हा परिषदेच्या आवारात भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यावर १ ऑगस्ट रोजी गोळीबार झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी अक्षय इंदोरिया, सत्यम देशमुख, ओम पवार, अजिंक्य नाईक व एका अल्पवयीन मुलाविरूद्ध हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. घटनेनंतर काही तासातच तिघांना पकडण्यात पोलिसांना यश आले होते. मात्र प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय इंदोरिया व ओम पवार हे दोघे फरार झाले होते. त्यांची माहिती सांगणाऱ्यास २५ हजारांचे बक्षिसही जाहीर करण्यात आले होते. मात्र दोन्ही आरोपी पोलिसांना गुंगारा देत होते. दरम्यान, पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, स्थागुशाचे पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे, शहरचे विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या नेतृत्वात पथक स्थापन करण्यात आले होते.
गुंतागुंतीच्या प्रकरणाचा छडा लावण्यात हातखंडा असलेल्या सपोनि शिवसांब घेवारे यांच्या पथकाने आरोपींचा शोध सुरू केला होता. आरोपींच्या शोधात पथकाने पश्चिम महाराष्ट्र पिंजून काढला होता. यावेळी दोन्ही आरोपी पुणे जिल्हा व परिसरात असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यावरून पथकाने अत्यंत शिताफिने अक्षय इंदोरिया व ओम पवार या दोघांसह त्यांना मदत करणाऱ्या अन्य एकास पकडले. त्यांना मंगळवारी पहाटे हिंगोलीत आणण्यात आले.
दरम्यान, पप्पू चव्हाण यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर आरोपींना अटक करावी, या मागणीसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाही काढण्यात आला होता. आता मुख्य आरोपी पकडण्यात यश आल्याने या प्रकरणाचा गुंता सुटण्यास मदत होणार आहे.