हिंगोलीत पोस्टाच्या कार्यक्रमात केवळ भाजपचेच पदाधिकारी; खासदार सातव यांना डावलल्याने कॉंग्रेस कार्यकर्त्यांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 07:09 PM2018-09-01T19:09:03+5:302018-09-01T19:33:22+5:30
खा. राजीव सातव यांना डावलत राजशिष्टाचाराचा भंग केल्याचा आरोप करत कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पोस्टाच्या कार्यालयासमोर काळे झेंडे दाखवत निदर्शने केली.
हिंगोली : भारतीय पोस्ट विभागाने उद्घाटनासाठी केवळ भाजपच्याच पदाधिकाऱ्यांना बोलावून एकाच पक्षाची भलामण केली आहे, यामुळे खा. राजीव सातव यांना डावलत राजशिष्टाचाराचा भंग केल्याचा आरोप करत कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पोस्टाच्या कार्यालयासमोर काळे झेंडे दाखवत निदर्शने केली. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध लोकसभा अध्यक्षांकडे हक्कभंग दाखल केला जाणार असल्याचे खा.राजीव सातव यांनी सांगितले.
शहरातील पोस्टाची नवीन इमारत आणि इंडियन पोस्ट बँकेची शाखा कार्यरत होण्यासाठी खासदार राजीव सातव यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून मंजूर करून घेतली. भारतीय पोस्ट पेमेंट बँकेच्या येथील शाखेचा शुभारंभाचा कार्यक्रम आज होता. यासाठी औरंगाबाद पोस्ट मास्टर जनरल कार्यालयाकडून प्रसिद्धीपत्रके काढली. त्यात केवळ हिंगोलीचे भाजपचे आ. तानाजी मुटकुळे व नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांनाच स्थान दिले. हे दोघेही भाजपचेच आहेत. त्यामुळे भाजपच्या प्रेमापोटी पोस्टाच्या अधिकाऱ्यांनी काँग्रेसच्या सर्वच संबंधितांना डावलल्याचा आरोप होत आहे.
केंद्र सरकारच्या अखत्यारीत हा विभाग असताना खासदारांना पत्रिकेतून डावलण्यात आल्याने संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोस्ट कार्यालयाच्या गेटवर काळे झेंडे दाखविले. यावेळी दत्ता बोंढारे, जुबेरमामू, ॠषिकेश देशमुख, प्रवीण बायस, अशोक सवंडकर, बंटी नागरे, मयूर राठोड, शेख अजिज यांना ताब्यात घेवून शहर पोलिसांनी नंतर त्यांची सुटका केली. यावेळी आ.संतोष टारफे आदींनी त्यांची पोलीस ठाण्यात भेट दिली.
इतरही लोकप्रतिनिधींना डावलले
या पत्रिकेवर औपचारिकता म्हणून तरी पालकमंत्री, जि.प.अध्यक्षा, विधान परिषदेच्या आमदारांची नावे असायला हवी होती. मात्र तीही नसल्याने हा कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. काँग्रेसने याला थेट विरोध केला असला तरीही इतरांनी केवळ दबक्या आवाजात ही भाजपची अरेरावी सुरू असल्याचा आरोप केला.
हक्कभंग आणणार
याबाबत प्रतिक्रिया देताना खा.राजीव सातव म्हणाले, मी या इमारतीसाठी निधी मिळविला. काम झाले तर उद्घाटनाला बोलावले नाही. आता या कार्यक्रमालाही तेच झाले. एवढेच काय जि.प. अध्यक्ष, विधान परिषद सदस्य यांनाही डावलले. मात्र स्थानिक भाजपा आमदारांना तेवढे बोलावले आहे. त्यामुळे हा प्रकार जाणीवपूर्वक केला हे दिसते. याची तक्रार लोकसभा अध्यक्षांकडे करून संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध संसदेत हक्कभंग प्रस्ताव मांडणार असल्याचे सातव यांनी सांगितले आहे.