हिंगोली: ओबीसी समाजाच्या मराठवाडास्तरीय दुसऱ्या एल्गार महामेळाव्यासाठी रविवारी हिंगोलीला जात असताना अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या ताफ्याला कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथे काळेझेंडे दाखविण्यात आले.
हिंगोली शहरातील रामलीला मैदानावर ओबीसी समाजाच्या दुसऱ्या मराठवाडास्तरीय एल्गार महामेळाव्याचे अयोजन २५ नोव्हेंबर रोजी करण्यात आले असून, या मेळाव्याच्या अनुषंगाने पोलिस प्रशासनाने सर्वत्र तगडा बंदोबस्त लावला आहे. याकरीता स्थानिकसह परजिल्ह्यातून पोलिस अधिकारी, कर्मचारी बंदोबस्तासाठी बोलाविण्यात आले आहेत. दुपारी १ च्या सुमारास छगन भुजबळ यांचा ताफा नांदेडकडून हिंगोलीकडे निघाला असताना कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूरजवळील वळण रस्त्यावर काळे झेंडे दाखवित ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी काळेझेंडे दाखविणाऱ्यांना पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले.