हिंगोली : जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ हिंगोली जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. यामुळे वाहतूक ठप्प झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
हिंगोली जिल्ह्यात मराठा आंदोलक कालपासूनच आक्रमक आहेत. काल बस जाळण्यासह बसवर दगडफेकीच्या घटनाही घडल्या होत्या. आज पुन्हा वसमत तालुक्यातील गिरगाव येथे रास्ता रोको आंदोलन करून चक्का जाम करण्यात आला. यामुळे या ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. याच तालुक्यात आडगाव, कौठा पाटी येथेही रास्ता रोको सुरू आहे.
तर कळमनुरी तालुक्यातील माळेगाव फाट्यावरही रास्ता रोको आंदोलन केल्याने नांदेड ते अकोला हा राष्ट्रीय महामार्ग ठप्प पडला आहे. तसेच डोंगरकडा येथेही रास्ता रोको आंदोलन सुरू आहे. आज सध्या तरी कुठेही अनुचित प्रकार घडल्याची वार्ता नाही. मात्र आंदोलकांनी जिल्ह्यातील प्रमुख मार्ग बंद केल्याने त्याची धग बसू लागली आहे. या प्रश्नावर तोडगा निघत नसल्याने आंदोलक रोजच आक्रमक होत असल्याचे चित्र आहे.