हिंगोली : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येक जण सुरक्षित अंतर पाळत आहे. मात्र, हे अंतर मृत्यूनंतरही कायम राहत असून, रक्ताचे नातेवाईकही अंत्यसंस्कारानंतर उरलेली राख नेत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे अंत्यसंस्काराची राख जागेवरच राहत असून, या राखेचे करायचे काय, असा प्रश्न निर्माण होत आहे.
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण दररोज आढळून येत आहेत. आतापर्यंत १५ हजार २८३ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. १४ हजार ४३० रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. प्रशासन कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवीत असले तरी वाढती रुग्णसंख्या चिंतेचा विषय बनली आहे. यामुळेच प्रत्येक जण आरोग्याची काळजी घेत आहे. मात्र, तरीही जवळपास ३३२ जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला. त्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या अंत्यसंस्कारासाठीही जवळच्या नातेवाइकांना उपस्थित राहता येत नाही. रुग्णालयातून निघालेली रुग्णवाहिका थेट स्मशानभूमीत दाखल होत आहे. कोरोनामुळे जवळचे व रक्ताचे नातेही दूर जात आहे. दरम्यान, अंत्यसंस्काराची राख (अस्थी) नदीतील पाण्यात विसर्जन करण्याची परंपरा आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर स्मशानभूमीतून अनेक नातेवाईक राख नेत नसल्याचे चित्र हिंगोली शहरातील काही स्मशानभूमीत पाहावयास मिळाले. अंत्यसंस्कारानंतर उरलेली राख नातेवाईक नेत नसल्याने स्मशानजोगी बांधवांना उचलावी लागत आहे.
अस्थींचे करायचे काय?
कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारानंतर नातेवाईक अस्थीही नेत नसल्याने स्मशानभूमीतच राहत आहेत. दररोज काही जणांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे साचलेली राख बाजूला केल्याशिवाय दुसऱ्या मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करता येत नाहीत. स्मशानजोगी बांधवांनाच साचलेली राख बाजूला सारावी लागत आहे. राख, अस्थी बाजूला सारली जात असली तरी या राखेचे करायचे काय, असा प्रश्न मात्र त्यांच्यासमोरही उभा राहत आहे.
कयाधूू काठ, स्मशानभूमी
हिंगोली शहरातील औंढा रोडवरील कयाधू नदी काठावर सुसज्ज स्मशानभूमी उभारण्यात आली आहे. या ठिकाणी नातेवाइकांना बसण्यासाठी आसन व्यवस्था आहे. या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाल्यानंतर नातेवाईक तिसऱ्या दिवशी राख व अस्थी घेऊन जात आहेत. त्यामुळे येथील स्मशानभूमीत राख शिल्लक दिसली नाही.
यशवंतनगर, स्मशानभूमी
हिंगोली येथील अकोला रोडवरील यशवंतनगरातील स्मशानभूमीतही अंत्यसंस्कार करण्यात येतात. मागील दोन महिन्यांत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांवरही अंत्यसंस्कार करण्यात आलेे. मात्र, येथे अंत्यसंस्कार झाल्यानंतर अनेक नातेवाइकांनी राख नेली नाही. त्यामुळे ही राख गोळा करून स्मशानभूमी ओट्याच्या बाजूला ठेवली आहे.
अकाेला रोड, स्मशानभूमी
हिंगोली ते अकोला रोडवरील स्मशानभूमीतही अंत्यसंस्कार करण्यात येतात. येथेही मागील दोन महिन्यांत अंत्यसंस्कार करण्यात आले. येथे पाहणी केली असता येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केल्यानंतर नातेवाइकांनी राख नेल्याचे पाहावयास मिळाले.
काय म्हणतात स्मशानजोगी...
कोरोनामुळे मृत झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार झाले तरी येथे अंत्यसंस्काराला आलेले नातेवाईक तिसऱ्या दिवशी अस्थी नेतात. जवळच कयाधू नदी असल्याने त्यात विसर्जनही काही नातेवाईक करतात. त्यामुळे स्मशानभूमीत राख शिल्लक राहत नाही.
-शिवाजी चौधरी, महाराज
कोरोनामुळे मृत झालेल्या रुग्णाचे बहुतांश नातेवाईक अंत्यसंस्कारानंतर राख, अस्थी नेण्यासाठी येत नाहीत. त्यामुळे ही राख आम्हालाच बाजूला सारून साफसफाई करावी लागत आहे.
-शेषराव सायन्ना इरेवाड
येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाल्यानंतर नातेवाईक अस्थी, राख उचलून नेतात. आतापर्यंत तरी राख, अस्थी शिल्लक राहिली नाही. नातेवाइकांनी राख नेली आहे.
-शंकर साहेबराव शेळके