हिंगोली : तक्रारदाराच्या पत्नीच्या नावे जमिनीचा फेर करून देण्यासाठी २० हजारांची लाच स्वीकारणाऱ्या मंडळ अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश २० मे रोजी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी काढले आहेत.
येहळेगाव सोळंके मंडळाचे मंडळ अधिकारी उत्तम रतनराव डाखुरे यांनी संबंधित तक्रारदाराच्या पत्नीच्या नावे जमिनीचा फेर करून देण्यासाठी लाचेची मागणी केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून डाखुरे यांना हिंगोली येथे २० हजारांची लाच घेताना पकडले. याबाबत हिंगोली शहर पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. ९ मे २०२४ रोजी त्यांना या प्रकरणात अटक करण्यात आली होती.
याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर झाल्यानंतर त्यांनी डाखुरे यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत. प्रशासनाची प्रतिमा मलीन झाल्याचा ठपका ठेवत ही कारवाई केली. तर निलंबनाच्या काळात तहसील कार्यालय वसमत येथे मुख्यालय राहील, असेही आदेशात म्हटले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागासही तसे कळविण्यात आले आहे.