सेनगाव : तालुक्यातील सुकळी बुद्रुक येथे २५ मे रोजी जाळून घेऊन आत्महत्या केलेल्या ३० वर्षीय महिलेचा उपचारांदरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी महिलेचा मृतदेह तिच्या नातेवाइकांनी सेनगाव पोलीस ठाण्यात आणला होता. गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह हलविणार नाही, अशी भूमिका घेतल्याने दीड तास हा गोंधळ सुरू होता.
तालुक्यातील सुकळी बु. येथील छाया जगन शिंदे वय (३०) या महिलेने जाळून घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. तिच्यावर नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, २९ मे मध्यरात्रीच्या सुमारास उपचारांदरम्यान मृत्यू झाला. या महिलेचे माहेर भंडारी (ता. सेनगाव) असून, पती जगन आंबादास शिंदे यांच्याकडून सततच्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून सुकळी बु. येथील राहत्या घरी जाळून घेतल्याचा आरोप महिलेच्या नातेवाइकांनी केला. याप्रकरणी मृत महिलेच्या पतीवर तातडीने गुन्हा दाखल करून अटक करावे, यासाठी शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास महिलेचे मृतदेह घेऊन नातेवाईक पोलीस ठाण्यात दाखल झाले. यामुळे चांगलाच गोंधळ उडाला. जोपर्यंत गुन्हा दाखल होऊन आरोपीस अटक होणार नाही, तोपर्यंत पोलीस ठाण्यातून जाणार नाही, अशी भूमिका घेतली. या प्रकारानंतर सहायक पोलीस निरीक्षक श्रद्धा लोकडे, पोलीस उपनिरीक्षक बाबूराव जाधव, पोलीस उपनिरीक्षक अभय माकणे यांनी नातेवाइकांची समजूत काढत तातडीने गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतले. त्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह हलविला. मुलीचे वडील सुभाष मोतीराम थिट्टे यांच्या फिर्यादीवरून सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.