हिंगोली : अचानक लागलेल्या आगीत हाॅटेल, क्लाॅथ सेंटर, ऑटोमोबाइल्ससह चार दुकाने जळून खाक झाल्याची घटना कळमनुरी तालुक्यातील बोल्डा फाटा येथे १६ एप्रिल रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत जवळपास २२ लाखांवर नुकसान झाल्याचा अंदाज घटनास्थळी व्यक्त करण्यात येत होता.
कळमनुरी तालुक्यातील बोल्डा फाटा येथे कापड, हाॅटेल, ऑनलाइन सेंटर, मोबाइल विक्री व दुरुस्ती आदी दुकाने आहेत. मंगळवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे दुकाने बंद करून व्यापारी घरी गेले होते. रात्री १० वाजण्याच्या सुमारास दुकानांना अचानक आग लागली. आगीची घटना लक्षात येताच ग्रामस्थांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतु, काही क्षणातच आग भडकली. या घटनेत सुनील शिंदे यांचे रोकडेश्वर हाॅटेल जळून खाक झाले असून, यात ३ लाख रुपयांचे नुकसान झाले. तसेच निरज ढोकणे यांचे राधाकृष्णा ऑटोबाइल्समधील सर्व साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. यात ८ लाख रुपयांचे नुकसान झाले. याशिवाय संदीप मंदाडे यांचे साई क्लाॅथ सेंटर जळून खाक झाल्याने ३ लाख रूपयांवर तर विशाल ढोकणे यांचे श्रीकृष्ण ऑनलाइन व मोबाइल सेंटरचे ३ लाख १० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
तसेच आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आजूबाजूची टिनपत्र्याची दुकाने जेसीबीच्या सहाय्याने तोडावी लागल्याने जवळपास ५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे दुकानमालक बाळासाहेब ढोकणे यांनी सांगितले. महसूल विभागाकडून घटनेचा पंचनामा करण्यात आल्याची माहिती आहे.
हिंगोली, वसमत, कळमनुरीच्या अग्निशमन दलाचे चार तास अथक प्रयत्न...बोल्डा फाटा येथील दुकानांना लागलेली आग काही क्षणातच भडकली. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळविणे शक्य होत नसल्याने हिंगोली, वसमत व कळमनुरी या तिन्ही ठिकाणच्या अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले होते. जवळपास चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास आग अटोक्यात आली. या आगीत लाखों रूपयांचे नुकसान झाले आहे.