कौठा (जि.हिंगोली) : रविवारी आत्महत्या केलेला राजू रोज मजुरीवर जायचा. घरचे दोन एकर शेत. यंदाही सोयाबीन पेरले. परतीच्या पावसाने मोठे नुकसान झाले. वडील बाबूराव व आई सीताबाई यांच्यासह रोज मजुरी करून राजू शेती सांभाळायचा. त्याला तीन विवाहित बहिणी आहेत. मात्र नापिकी व गरिबी पिच्छा सोडत नसल्याची खंत त्याला सतावत होती. त्यामुळे त्याने मृत्यूला कवटाळले. सलग तीन दिवस तीन आत्महत्यांच्या घटनांमुळे छोटेसे बोराळा गाव सुन्न झाले आहे.
गावात सध्या याच एका विषयावर चर्चा सुरु आहे. याबाबत बोराळा गावचे सरपंच भीमराव जाधव यांना विचारले असता ते म्हणाले, सोयाबीन हातचे गेले. कर्जमाफीचा लाभ नाही. यात अनेक शेतकरी नाराज आहेत. मात्र त्यामुळे परिस्थितीसमोर हार मानून कसे चालणार? आर्थिक मदत करणे शक्य नसले तरीही लोकांमध्ये नवी उमेद जागविण्यासाठी जनजागृती करणार आहोत. यासाठी जिल्हा प्रशासनाने काही मदत केली तर अधिक बरे होईल, असे ते म्हणाले.
ग्रामस्थ हादरले, शब्दही फुटेनात !सलग तीन दिवस घडलेल्या आत्महत्यांच्या घटनांनी ग्रामस्थ पार हादरून गेले. ४00 ते ५00 उंबऱ्यांचे हे गाव यंदा सुरुवातीपासून अतिवृष्टी, दुबार, तिबार पेरणीने हैराण आहे. प्रभाकर जाधव, राजू गंगातिरे यांना आर्थिक विवंचना सोसवली नसल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचलले, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सुरुवातीला तर या एकाही प्रकरणाबाबत कुणी बोलायला तयार नव्हते.
प्रभाकरलाही नापिकीचा फटकाप्रभाकर जाधव हाही पंचफुला व घनश्याम यांचा एकुलता एक मुलगा. पत्नी कविता व ६ आणि ४ वर्षांच्या दोन चिमुकल्यांना उघड्यावर टाकून त्याने जीवन संपविले. त्याच्या नावे ५४ आर. तर कुटुंबाकडे एकूण दोन हेक्टर जमीन आहे. शेतातील सोयाबीन व कापूस अतिपावसामुळे हातचे गेल्याने प्रभाकर चिंताग्रस्त होता.