लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : खा. राजीव सातव आणि मी मराठवाड्याच्या विकासासाठी दोघे लढत आहोत, लढत राहू अशा शब्दात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी फटकेबाजी लावत विरोधकांवर टीका केली. वसमत येथे आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व ग्रंथालयाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. २० एप्रिल रोजी आयोजित भुमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.वसमत येथे खा. राजीव सातव यांच्या निधीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व ग्रंथालयाची उभारणी होत आहे. या कामाचे भूमिपूजन शुक्रवारी झाले. यावेळी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, खा. राजीव सातव यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून चेअरमन शंकरराव खराटे, माजी नगराध्यक्ष शिवदास बोड्डेवार, काँग्रेस प्रदेश सचिव अ.हफीज अ. रहेमान, सुनील काळे, यशवंतराव उबारे, राजू पाटील नवघरे, सिद्धार्थ हत्तिअंबिरे, भदंत उपगुप्त महाथेरो, खैसर अहेमद, जिल्हाध्यक्ष संतोष बोंढारे, पक्ष निरीक्षक अमर खानापुरे, महिला प्रदेश सचिव सीमा हाफीज.आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना खा. राजीव सातव यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा व ग्रंथालय इमारतीसाठी निधी कमी पडणार नाही, अशी ग्वाही दिली. अशोकराव चव्हाण हे मुख्यमंत्री म्हणून काम पूर्ण झाल्याच्या कार्यक्रमास हजर राहतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ५० लाखांच्या निधीतून काम पूर्ण झाले नाही, तरी वाढीव निधीची व्यवस्था करू, मात्र निधीअभावी काम थांबू देणार नाही. असे त्यांनी सांगितले. भाजपचे माजी नगराध्यक्ष शिवदास बोड्डेवार यांनी अर्थमंत्री मुनगुंटीवार यांच्याकडून या कामासाठी १ कोटी रुपये निधी मंजूर करून घेणार असल्याचे सांगून यासंदर्भात मुनगुंटीवार यांच्याशी चर्चाही झाल्याचे सांगितले. यावेळी सिद्धार्थ हत्तिअंबिरे यांचेही भाषण झाले. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्यांनी विरोधकांना टोला लगावत सध्याचे सरकार निकम्मो की सरकार असल्याचे सांगत आगामी काळात आपलेच सरकार येणार असा विश्वास दाखविला. खा. राजीव सातव व मी एका व्यासपीठावर आलो ते केवळ काड्या करणाऱ्यांसाठीच. तुम्ही काड्या करत राहा, आम्ही कामे करत राहू, असा टोलाही त्यांनी लगावला. प्रास्ताविक प्रशांत गायकवाड यांनी तर सूत्रसंचलन प्रकाश इंगळे, आभार गौतम मोगले यांनी मानले. या कामासाठी सतत दहा वर्षांपासून पाठपुरावा करून काम मार्गी लावणारे यशवंतराव उबारे यांचा यावेळी उपस्थितांनी गौरव केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी वसमतला सुजलाम सुफलाम बनवणारे कै. शंकरराव चव्हाण यांचा पुतळा वसमत येथे उभारण्यासाठी खा. राजीव सातव यांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. यशस्वीतेसाठी यशवंतराव उबारे यांच्यासह पुतळा समितीच्या सर्व पदाधिकारी व आंबेडकरी विचारांच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
मराठवाड्याच्या विकासासाठी दोघेही लढत राहू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 12:48 AM