हिंगोली : सेनगाव तालुक्यातील बोडखा येथील एका घरातून विदेशी बनावटीचे पिस्टल, ३ जीवंत काडतूस ४ डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केले. पोलिसांनी यावेळी दोघांना जेरबंद केले आहे.
सेनगाव तालुक्यातील बोडखा तांडा गावातील धनसिंग उर्फ भाऊ शेषेराव राठोड याने त्याच्या घरामध्ये एक विनापरवाना पिस्टल, जीवंत काडतूस, भरमार रायफल, चाकु लपवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांचे मार्गदर्शनाखाली हिंगोली स्थानिक गुन्हे शाखा व दहशदवाद विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी बोडखा येथील मिळालेल्या माहितीची पडताळणी केली.
यानुसार गावातील धनसिंह राठोड याच्या घराची झडती घेतली. यावेळी एका खोलीत कोपऱ्यात धान्याच्या पोत्याच्या आडोशाला भिंतीला चिटकून एक अग्नीशस्त्र (पिस्टल) किंमत अंदाजे ५०,००० रू. चे मिळून आले. पिस्टलचे मॅक्झीन काढून पाहणी केली असता, यामध्ये ३ जीवंत काडतूस किंमत अंदाजे १०,००० रू. व पांढऱ्या धातुचा चाकू मिळून आला. तसेच त्याच्या बाजुला एक भरमार रायफल किंमत अंदाजे ५,००० रू. व एका छोट्या पिशवीमध्ये अंदाजे १५० छर्रे किंमती १०० रू. मिळून आले. याप्रकरणी घरमालक धनसिंग उर्फ भाऊ शेषेराव राठोड ( वय. २३) , नवनाथ शेषेराव राठोड ( वय २१, रा. बोडखा तांडा ता. सेनगांव ) या दोघांना ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे बेकायदेशीर विनापरवाना एक पिस्टल व ३ जीवंत काडतूस व भरमार रायफल, छऱ्यासह व एक चाकु असा एकूण ६५ हजार ४०० रूपयांचा जप्त करण्यात आला आहे. त्यांचे विरूध्द औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू होती.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, ए.एस.पी. यतीश देशमुख, पोलीस निरीक्षक पंडीत कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि शिवसांब घेवारे, पोउपनि सुभाष आढाव, पोउपनि बाबासाहेब खार्डे, पोहेकॉ शंकर जाधव, विलास सोनवणे, माणिक डुकरे, माधव भडके, अर्जून पडघण, रूपेश धाबे, महेश बंडे, शेख शफी, आकाश टापरे, पुणम वाघमारे, बोचरे, प्रकाश कांबळे यांच्या पथकाने केली आहे.