लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीत अजूनही म्हणावी तशी रंगत भरली नाही. ठराविक मतदारसंख्या असल्याने त्यांच्यापर्यंत पोहोचणे एवढे अवघड नसल्याचे समजून उमेवारही निश्चिंत आहेत. कोणी मतदारांना भेट म्हणून आंब्याची पेटी पाठवत आहे, तर कोणी नातेवाईकांमार्फत बोलावून चहापाण्यावरच बोळवण करीत आहे. मतदारांना या आंब्यांमध्ये कोणताच रस नसून यथोचित सन्मान कधी होणार, याची प्रतीक्षा आहे.यंदा अधिक मास असल्याने लग्नतिथी कमी आहेत. येत्या १२ तारखेपर्यंत लागोपाठ आलेल्या लग्नतिथींमुळे आपापल्या भागातील जवळच्या लोकांच्या विवाह सोहळ्यांना हजेरी लावण्यात नगरसेवक, जि.प.सदस्य, पं.स. सभापती ही मंडळी मग्न असल्याचे दिसते. त्यामुळे ही मंडळी आपल्या मतदारांचे हित जोपासण्यासाठी एकेका दिवशी चार ते पाच विवाहस्थळी भेट देत आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतील उमेदवारांना एकेकाला गाठण्याची वेळ येत आहे. त्यातच एका उमेदवाराने तर शक्कल लढवत मतदार भेटो अथवा न भेटो, त्याला आपली आठवण यावी म्हणून आंब्यांची पेटी भेट दिली जात आहे. या प्रकाराची आता मतदारांमध्येही चर्चा होत आहे. मात्र त्यातही मला मिळाली, तुम्हाला का नाही, याचीही विचारणा होत आहे. कदाचित हे वाटप सुरूच असल्याने अनेकांपर्यंत ती पोहोचणे बाकी असावी. तर दुसऱ्या एका उमेदवाराने नातेवाईकालाच कामाला लावले. चहा किंवा ज्युस पाजवून ओळख पटवून देण्यातच वेळ जात आहे. तर अन्य एका उमेदवाराचा पत्ताच नाही.१२ मेपर्यंत लग्नसोहळे चालणार असल्याने तोपर्यंत उमेदवारांना मतदार भेटणे अवघडच आहे. त्यामुळे त्यानंतरच खºया अर्थाने प्रचाराला व फोडाफोडीला वेग येणार आहे. मात्र तोपर्यंत केवळ या निवडणुकीच्या चर्चाच रंगणार असल्याचे दिसत आहे.विरोधकांवर नजरकाँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीच्या सुरेश देशमुख यांचा शिवसेनेच्या विप्लव बाजोरिया यांच्याशी थेट लढा आहे. तर भाजपचे सुरेश नागरे यांनी बंडखोरी केलेली आहे. शिवसेनेला भाजपची मते कव्हर करून आघाडीत फोडाफोडी करायची आहे. तर आघाडीला आपली मते शाबित राखण्याची कवायत साधता आली तरीही गड जिंकणे अवघड नाही. कोण कसा गळाला लावायचा, यासाठी लंकाभेदींचा शोध सुरू आहे. ते कोणत्या रुपाने समोर अवतरतील, हे उमेदवारांना ओळखावे लागणार आहे.स्थानिक प्राधिकारी निवडणुकीत पक्षीय बलाबल, त्यामुळे बंधनात अडकलेले सदस्य, त्यामुळे यथोचित सन्मान होईल की नाही, याची नसलेली शाश्वती याची जोरदार चर्चा होत आहे. आंब्याच्या पेटीने औपचारिक स्वागत झाले. त्याचा ‘भाव’ तो काय, मात्र योग्य भाव देऊन ‘यथोचित’ सन्मान सोहळ्याचा मुहूर्त कधी लागणार आहे, याची अपेक्षा व्यक्त होताना दिसत आहे. काहींना तर दोन्हींकडचा पाहुणा होण्याची घाई झाल्याचेही दिसून येत आहे. तर काहींची खरोखरचा पाहुणाच उमेदवार असल्याने अडचण झाली. प्रत्येकाच्या अडचणी वेगळ्या असल्या तरीही एक वगळता उर्वरित दोन उमेदवारही तेवढेच अनुभवी व मुरब्बीही आहेत. विरोधकाला धोबीपछाड देण्यासाठी कोणी ‘भाव’च द्यायला तयार नाही. वरवरच्या भुलभुलैय्यात मतदारांना अडकवून ठेवले आहे. एकदा का समोरच्याने ‘भाव’ देणे सुरू केले की, त्यापेक्षा काकणभर सरस ठरणारा ‘सन्मान’ सोहळा घेऊन मतदारांची मर्जी राखत विरोधक गारद करण्याची तयारी सुरू आहे.
आंब्याच्या पेटीत ‘भाव’-ना-रस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 1:02 AM