लोकमत न्यूज नेटवर्कवारंगा फाटा : कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव येथे चोरट्यांनी दोन भावांच्या घरी चोरी करून रोख रक्कम सोने चांदीचे दागिने व दुचाकी सह दीड लाखांच्यावर ऐवज लंपास केल्याची घटना घडली असून परिसरात भीतीचे वातावरण आहे.कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव येथील नवी अबादी येथे ७ डिसेंबरच्या रात्री २.३० वाजेच्या सुमारास येथील यशवंत माधवराव कºहाळे व साईनाथ माधवराव कºहाळे या दोन भावांच्या घरातील कपाट उघडून त्यातील अंदाजे एक लाख रुपयांचे दागिने, तीस हजार रुपये रोख रक्कम आणि हँडल लॉक करुन दारात उभी असलेली दुचाकी क्रमांक एमएच-३८ आर-४१०३ देखील घेऊन चोरटे पसार झाले. तुपाचा डब्बाही चोरटे घेऊन गेले. सकाळी झोपेतून उठल्यानंतर चोरी झाल्याचे कुटुंबियांच्या निदर्शनास आले असता आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे पोनि व्यंकटेश केंद्रे यांना माहिती दिली. माहिती मिळताच बाळापूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक केंद्रे, पोहेकाँ शेळके, संदीप चव्हाण, जमधाडे आदी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. धाडसी आणि मोठी चोरी झाल्याचे गांभीर्य लक्षात घेत हिंगोली येथील श्वानपथक व ठसे तज्ज्ञानांना पाचारण करण्यात आले. श्वान मात्र कुठलाही मार्ग काढू शकला नाही. दरम्यान येथील पंडितराव साळुंके यांच्या घराचे गेटचे कुलूप तोडले. मात्र घरातील मंडळींना जाग आल्याने चोरट्यांनी पळ काढला. अन्य ठिकाणी चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला असता घरातील मंडळींना जाग आल्याने तेथूनही चोरटे पळाले. त्यानंतर कºहाळे कुटुंबियांच्या घरात चोरी केली. याप्रकरणी शुक्रवारी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. मागील काही महिन्यांपासून येथील परिसरात एका पाठोपाठ धाडसी चोरीच्या घटना घडतच आहेत. परंतु पोलिसांना मात्र तपास कामात यश आले नाही. त्यामुळे येथील परिसरातील ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दांडेगाव येथे धाडसी चोरीची घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2018 11:58 PM