लोकमत न्यूज नेटवर्कशिरडशहापूर : औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथील शे.रफिक शे. नन्नू यांच्या राहत्या घरात चोरी झाल्याची घटना २३ आॅगस्टच्या मध्यरात्री घडली.रजा मोहल्ला येथील शे. रफीक शे. नन्नू यांच्या घराचे चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला. यावेळी कपाटाचा दरवाजा तोडून पर्समध्ये ठेवलेले ८ हजार रुपये नगदी व ५ ग्रॅम सोन्याचे गंठण, ७ ग्रॅमची जलसर असा एकूण ४५ हजार ५०० रुपये मुद्देमाल चोरीस गेला आहे. त्यानंतर चोरट्यांनी बाजूलाच असलेल्या मो. जहीर मो. सादख यांच्या वाड्यातील काही घरांच्या दरवाज्याची बाहेरून कडी लावून कुलूप तोडले व आत प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी घरात हळदीचे पोते भरलेले पाहून साहित्याची नासधूस केली व पसार झाले.घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी कुरूंदा पोलीस ठाण्याचे फौजदार नेटके, जमादार नेव्हल यांनी भेट दिली. यावेळी श्वान पथकास, फिंंगर प्रिंट तज्ज्ञ यांना पाचारण करण्यात आले होते. याप्रकरणी शे. रफीक यांच्या फिर्यादीवरून चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरडशहापूर व परिसरात अनेकवेळा चोरीच्या घटना घडल्या. सराफा दुकान, एटीएम मशीन तसेच चारचाकी वाहने सुद्धा चोरट्यांनी पळवून नेले आहेत. परंतु अद्याप चोरीचा एकही गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले नाही. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी परिसरातील चोरीच्या घटनांची चौकशी करून आरोपींना अटक करावे व जनतेला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे.
घराचे कुलूप तोडून ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 12:46 AM