कळमनुरी (हिंगोली): घरकुलाच्या फाईलवर स्वाक्षरीकरून उर्वरित १ लाख ५ हजारांची रक्कम बँक खात्यावर जमा करण्यासाठी १८ हजारांची लाच स्विकारताना कंत्राटी अभियंत्यास हिंगोलीच्यालाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई २३ एप्रिल रोजी करण्यात आली. या प्रकरणी लाचखोर कंत्राटी अभियंत्यावर कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.
मोहम्मद अखीब मोहम्मद वाजिद फारुकी (रा.नुरी मोहल्ला, कळमनुरी) असे लाचखोर ग्रामीण गृह निर्माण कंत्राटी अभियंत्याचे नाव आहे. तक्रारदाराच्या पत्नीच्या नावे प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेअंतर्गंत घरकूल मंजूर झाले आहे. त्या घरकुलाचे बांधकाम पूर्ण झाले असून घरकुलासाठी मंजूर झालेल्या १ लाख २० हजार रूपयांपैकी १५ हजारांचा पहिला हप्ता तक्रारदारांच्या पत्नीस मिळाला आहे. तक्रारदाराच्या पत्नीचे घरकुलाचे बांधकाम पूर्ण झाल्याने त्या फाईलवर स्वाक्षरी करून उर्वरित १ लाख ५ हजार रूपये बँक खात्यावर जमा करण्यासाठी मोहम्मद अखीब याने २० हजारांच्या लाचेची मागणी केली.
मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने हिंगोलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. त्यानुसार पथकाने शासकीय पंचासमक्ष लाच मागणीची पडताळणी केली असता कंत्राटी अभियंत्याने सुरूवातीला २० हजारांची मागणी करून तडजोडीअंती १८ हजार रूपये लाच स्विकारण्यास शासकीय पंचासमक्ष संमती दिली. त्यानंतर १८ हजार रूपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मोहम्मद अखीब यास रंगेहात पथकडले. या प्रकरणी कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रीया सुरू होती. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोलीचे पोलिस उपअधीक्षक अनिल कटके यांच्या पथकाने केली.
यापूर्वीही पंचायत समितीमध्ये दोघांवर कारवाईयापूर्वी २०२० मध्ये कळमनुरी पंचायत समितीचे तत्कालीन गट विकास अधिकारी मनोहर खिल्लारी व सहायक लेखाधिकारी दत्तात्रय शिंदे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाच्या पथकाने कार्यवाही केली होत. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण योजने अंतर्गत लाभार्थ्याचे वैयक्तिक शौचालय बांधकामाचा चेक देण्यासाठी ७ रुपये लाचेची रक्कम मागणी करून स्वीकृती केली होती.