लोकमत न्यूज नेटवर्ककेंद्रा बु. : हिंगोली तालुक्यातील जयपूर पाटी व गजानन महाराज मंदिरा जवळील मराठवाडा-विदर्भ जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावरील पूल मागील दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे पुराच्या प्रवाहात हा पूल दोन जागी तुटला आहे.हा पूल रात्री-अपरात्री अचानक कोसळल्यास मोठी जीविहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत असलेल्या या रस्त्याची चाळण झाली असून हिंगोली, खंडाळा, जयपूर, माळसेलू, ब्राम्हणवाडा शिवारात येत असलेल्या सर्वच पुलाची सध्या मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. हिंगोली- गोरेगाव केंद्रा आदी ५० गावांचा संपर्क हिंगोली शहराशी येतो, मात्र रस्त्याची चाळण व पुलाची दुरावस्था झाल्यामुळे हा रस्ता बंद होण्याच्या मार्गावर आहे. गेल्या पंचवीस वर्षांपासून या रस्त्याचे डागडुजीशिवाय कोणतेच काम झालेले नाही. पुलाची अवस्था ‘जैसे थे’च आहे. ब्राह्मणवाडा पाटीपासून चौंढी बु. या मुख्य रस्त्यावर पावसाच्या प्रवाहाने रस्ता तुटला असून छोट्या पुलाच्या मध्यभागी खड्डा पडला आहे. यामुळे बांधकाम विभाग अपघाताला निमंत्रण देत असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे. मुसळधार पाऊस झाल्यास हा रस्ता बंद पडणार की काय? हा प्रश्न ग्रामस्थांतून उपस्थित होत आहे. सा.बां. विभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
जयपूरपाटीजवळील पूल तुटला; रस्ता बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2018 1:12 AM