हिंगोली: पंतप्रधानांनी उज्ज्वला योजनेचा दुसरा टप्पा सुरू केला आहे. कोणतीही अनामत रक्कम न भरता अल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबांना गॅस कनेक्शन देण्यात येत असून जिल्ह्यात सद्य:स्थितीत जवळपास ६५ ते ७० कनेक्शन दिल्याचे सांगण्यात आले.
पूर्वी सिंगल गॅस घ्यायचा झाल्यास अनामत रक्कम १ हजार ६०० रुपये तर डबल घ्यायला झाल्यास ३ हजार ५० रुपये भरावी लागत असे. शासनाने अनामत रक्कम न भरता कनेक्शन देण्याचे जाहीर केले आहे. परंतु, गॅसच्या किंमती गगनाला भिडल्यामुळे गॅस न घेतलेला बरा, अशी प्रतिक्रिया गृहिणीनी दिली. सद्य:स्थितीत गॅसची किंमत ८१९ रुपये झाली आहे. आजमितीस दुपट्टी-तिप्पटीने भाव वाढला आहेत. त्यामुळे चुलीवर स्वयंपाक बरा, असेही गृहिणी म्हणत आहेत.
गॅस सिलिंडरचे दर (रुपयात)
जानेवारी २०१९- ६३५
जानेवारी २०२०-७७०
जानेवारी २०२१ -७७०
ऑगस्ट २०२१ -८१९
जिल्ह्यात आतापर्यंत दिलेले उज्ज्वल कनेक्शन ६५
गॅसच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. गॅस एकदा भरून आणला की महागाईमुळे वापरावा सुद्धा वाटत नाही. चुलीवर स्वयंपाक केलेला बरा. पाणी, चहा चुलीवर करतो. जेवण मात्र गॅसवर बनविले जात आहे.
द्रोपदाबाई विश्वनाथ घ्यार, गृहिणी
शासनाने गॅस कनेक्शन मोफत केले आहे. परंतु, गॅसच्या किमती मात्र कमी केल्या नाहीत. दर दोन-तीन महिन्याला गॅसच्या किमती वाढत आहेत. हे कोणालाच परवडत नाही. यामुळे गॅस शोभेची वस्तू बनत आहे.
-यशोदा इंगोले, गृहिणी
धुराने घर काळे होते म्हणून गॅस कनेक्शन घेतले. परंतु गॅसचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने घर काळे झालेले बरे असे म्हणण्याची वेळ आली आहे. कारण महागाईमध्ये गॅस घेणेही न परवडणारे असेच आहे.
-सुरेखा कल्याणकर, गृहिणी
फोटो २५