हिंगोली : टेम्पो वाहन घेण्यासाठी माहेराहून सात लाख रूपये घेऊन, ये या कारणावरून २२ वर्षीय विवाहितेस विजेचा शॉक देवून खून करण्यात आला. ही घटना तालुक्यातील लिंबाळा मक्ता येथे २२ जून रोजी दुपारी २ वाजता घडली. या प्रकरणी रविवारी रात्री उशिरा हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात ७ जणांविरूद्ध गुन्हा नोंद झाला.
नाजीया बी शेख हुसेन उर्फ न्यामत (रा. पळसोना ता. हिंगोली) असे मयत विवाहितेचे नाव आहे. विवाहानंतर काही दिवस चांगले वागविल्यानंतर सासरच्या मंडळींनी त्यांचा छळ करण्यास सुरूवात केली. त्यानंतर नाजीयाबी व त्यांचे पती शेख हुसेन हे लिंबाळा मक्ता येथे कामानिमित्त राहण्यासाठी आले. दरम्यान, टेम्पो घेण्यासाठी माहेरावरून ७ लाख रुपये घेऊन ये, असे म्हणून नाजीयाबी यांचा छळ करण्यात येत होता. माहेरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्या पैसे आणू शकत नव्हत्या. त्यानंतर २२ जून रोजी सासरच्या मंडळींनी नाजीयाबी यांना विजेचा शॉक देऊन त्यांचा खून केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी शेख अब्दूल शेख मदार (रा. संतुक पिंपरी ता.हिंगोली) यांच्या फिर्यादीवरून शेख हुसेन उर्फ न्यामत शेख अहेमद, शेख अहेमद, शेख इरफान शेख अहेमद, शेख हामीद शेख चाँद व अन्य तिघांविरूद्ध ( सर्व रा. पळसोना) यांच्या विरुध्द हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी एस.एस. दळवे, सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय रामोड, उपनिरीक्षक संतोष मुपडे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली.