हिंगोली : समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांपैकी कोणत्याही योजनेचा प्रस्ताव घेऊन या, त्याला मंजुरी देऊन हिंगोली जिल्ह्याला मदत करण्याची मनोमन इच्छा असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री सामाजिक अधिकारता कार्यक्रमात ऑनलाईन भाषणात केले.
या कार्यक्रमास खा. हेमंत पाटील, आ .तान्हाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, समाजकल्याण अधिकारी मिनगिरे यांच्यासह एलिम्कोचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी आठवले म्हणाले, दिव्यांगांना योग्य ती मदत मिळावी, ही आमची कायम भूमिका राहिली आहे. एकवेळ सर्वसाधारण माणूस तर मनाने दिव्यांग असू शकतो; मात्र दिव्यांग बांधव मनाने खंबीर असतात. त्यांना योग्यप्रकारचे साहित्य व वातावरण मिळाले, तर ते स्वत:ला सिद्ध करतात, असा माझा अनुभव आहे. हिंगोलीत ३ हजार लाभार्थ्यांना विविधप्रकारचे साहित्य मिळत आहे. खा. पाटील यांनी यासाठी केलेला पाठपुरावा वाखाणण्याजोगा आहे, असेही ते म्हणाले.
खा. पाटील म्हणाले, सामाजिक न्यायमंत्री आठवले यांनी केलेल्या मदतीमुळे आज २.७५ कोटी रुपयांचे साहित्य हिंगोली लोकसभा मतदार संघातील लाभार्थ्यांना मिळत आहे. त्यासाठी त्यांनी चाकोरी सोडून केलेली मदत कधीच विसरता येणार नाही. पक्षीय भेद बाजूला सारून त्यांनी ही मदत केली. १५ हजार लोकांच्या तपासण्या करून त्यांना नंतर साहित्य देणे ही काही सोपी बाब नाही. मात्र एलिम्कोच्या अधिकाऱ्यांनी हे शक्य केले. खेड्यापाड्यातील ज्या दिव्यांगांना बाहेरही पडता येणे शक्य नाही, त्यांना या साहित्याची मोठी मदत होणार आहे. अंध, कर्णबधिर, हात, पायाने अधू अशा विविध प्रकारच्या लाभार्थ्यांना अत्याधुनिक साहित्य दिले जाणार आहे. सायकल, बॅटरीवरील सायकल, कुबड्या, वॉकर, कर्णयंत्र, ब्रेल लिपी कीट, मोबाईल आदी साहित्याचा यात समावेश आहे.
यावेळी आ. तान्हाजी मुटकुळे म्हणाले, सामाजिक न्याय मंत्रालयाच्यावतीने देशभरात केली जात असलेली ही मदत दिव्यांगांना सामर्थ्य देणारी आहे. यासाठी हिंगोली जिल्ह्यालाही आठवले यांनी मोठा निधी उपलब्ध करून दिल्याने त्यांचे आभार मानायला पाहिजे. भविष्यातही अशाच मदतीची अपेक्षा आहे.
यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात काही लाभार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले, तर कोरोनाच्या काळात एकाच ठिकाणी मोठी गर्दी होऊ नये, यासाठी उर्वरित लाभार्थ्यांना हे साहित्य पंचायत समित्यांमार्फत घरपोच दिले जाणार आहे. ग्रामसेवकांमार्फत त्यांचे वाटप होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सूत्रसंचालन संजय बोहरा यांनी केले. या कार्यक्रमाला दिव्यांग बांधवांसह इतर अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.