हिंगोली : मागील दहा दिवसांपासून मानव विकास बससेवा मराठा आरक्षणआंदोलनामुळे बंद आहे. यामुळे विद्यार्थ्यांची पायपीट होत असल्याचे चित्र आहे. तर काही ठिकाणी पर्यायी व्यवस्था म्हणून पालक चक्क बैलगाडीतून पाल्यांना शाळेत घेऊन जात आहेत.
राज्यभर सध्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. आंदोलना दरम्यान बसची तोडफोड केली जात असल्यामुळे राज्य परिवहन महामंडळातर्फे बससेवा रद्द करण्यात आली. औंढा तालुक्यातील जवळपास ४०० च्या वर विद्यार्थिनीनी मानव विकास बसने शाळेत ये-जा करतात. परंतु बससेवा बंद असल्याने या मुलीना पायपीट करण्याची वेळ आली. मात्र यावर उपाय म्हणून रूपूर येथील मुलींना पालक बैलगाडीतून शाळेत घेऊन जात आहेत. शिक्षणाचे महत्त्व अन् जागरूक पालक मुलींच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी धडपडत आहेत. लवकरात लवकर या मार्गावरील मानव विकासच्या बस सुरू करण्याची मागणी पालकांतून आहे. जिल्ह्यात मानव विकासच्या २१ बस आहेत. प्रत्येक तालुक्याला ७ बस, यामध्ये हिंगोली, सेनगाव व औंढा नागनाथ तीन तालुक्यांचा सामावेश आहे.
आगारप्रमुख म्हणतात...आंदोलनामुळे बसेसची तोडफोड करण्यात आली. त्यामुळे जवळपास ५० लाखांचा तोटा हिंगोली आगाराला बसला आहे. शिवाय चार ते पाच बसची तोडफोड झाली होती. त्यामुळे एकाही मार्गावरून बस सोडण्यात आल्या नाहीत. परंतु आता मागील दोन दिवसांपासून बससेवा सुरू करण्यात आली आहे. मानव विकासच्याही बस सोडल्या आहेत.- बी. बी. झरीकर, आगारप्रमुख