हिंगोली : सेनगाव तालुक्यातील जांभरून रोडगे येथे १६ ऑक्टोबर रोजी दुपारी घरी कोणी नसल्याची संधी साधून चोरट्याने शेतकऱ्याच्या घरातून रोख रक्कम सोन्या-चांदीचे दागिणे असा एकूण ७२ हजार ८०० रूपयांचा ऐवज लंपास केला होता. या प्रकरणात पोलिसांनी अवघ्या चार तासात चोरट्यास पकडून मुद्देमाल हस्तगत केला.
सेनगाव तालुक्यातील जांभरून रोडगे येथील शेतकरी फुलाजी लक्ष्मण रोडगे हे १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता परिवारासह घराला कुलूप लावून शेतामध्ये गेले होते. शेतातील काम आटोपून ते दुपारी घरी आले असता घरी चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. घराच्या दरवाजातून आत येत चोरट्याने रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिणे, असा एकूण ७२ हजार ८०० रूपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचे उघड झाले. या प्रकरणी नर्सी ना. पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तपासाची सूत्रे हाती घेत चोरट्यांचा शोध सुरू केला.
या वेळी चोरटा हा गावातीलच असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून पोलिसांनी गणेश शंकर रोडगे (रा. जांभरून रोडगे) याला ताब्यात घेतले. त्यास विचारपूस केली असता त्याने चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याचेकडून रोख रक्कम, सान्या चांदीचे दागिणे असा एकूण ७२ हजार ८०० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक राजेश मलपिलू, पोलिस अंमलदार गजानन पोकळे, लिंबाजी वाव्हळे, विठ्ठल काळे, महादू शिंदे, ज्ञानेश्वर पायघन, हरिभाऊ गुंजकर, प्रशांत वाघमारे, दिपक पाटील यांच्या पथकाने केली.