हिंगोली : घराला कुलूप असल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून रोख रक्कम व सोन्या चांदीचे दागिने लंपास केले. ही घटना शहरातील हनुमान नगर भागात १९ डिसेंबर रोजी पहाटे उघडकिस आली. यात नेमका किती ऐवज चोरीला गेला हे तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील हनुमान नगर भागात गजानन आनंदराव सरकटे यांचे घर आहे. सोमवारी सकाळी सरकटे कुटुंबिय एका कार्यक्रमासाठी बाहेरगावी गेले होते. यावेळी घराला कुलुप असल्याची संधी साधत चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर कपाट फोडून त्यातील साहित्य बाहेर काढून फेकून दिले. त्यानंतर रोख रक्कम व सोन्या चांदीचे दागिने घेऊन चोरट्यांनी पळ काढला.
दरम्यान, मंगळवारी सकाळी सरकटे यांचे घर उघडे दिसल्यामुळे शेजाऱ्यांनी जाऊन पाहणी केली असता घराचे कुलूप तोडलेले दिसले. घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच तातडीने पोलिसांनी माहिती देण्यात आली. तसेच सरकटे यांनीही कळविले. उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश दळवी, पोलिस निरीक्षक नरेंद्र पाडळकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, जमादार संजय मार्के, अशोक धामणे, धनंजय क्षिरसागर, संभाजी लकुळे आदींच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. यावेळी पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केले होते. मात्र श्वान चोरट्यांचा माग काढू शकला नाही. यात चोरट्यांनी एक लाखापेक्षा जास्त मुद्देमाल लंपास केल्याचे प्राथमिक माहिती मिळाली आहे. या प्रकरणी दुपारपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.