हिंगोली : वसमत तालुक्यातील वापटी येथे विवाहित महिलेला चारचाकी वाहन घेण्यासाठी मोहरहून २ लाख रुपये घेऊन ये, या कारणातून जीवंत जाळून खून केल्याची घटना मंगळवारी (दि.१७)घडली. याप्रकरणी पाच जणांविरूद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वापटी येथील मयत चंद्रभागा संभाजी शिंदे (३२) हिचा विवाह २००९ मध्ये झाला होता. या विवाहिेतेला दोन मुले आहेत. तिला चार वर्षांपासून सासरची मंडळी चारचाकी वाहन घेण्याकरिता माहेरहून २ लाख रुपये घेऊन ये, असे म्हणून मारहाण करून तिचा मानसिक व शारिरीक छळ करीत होते. याच कारणातून सासरच्या मंडळींनी १७ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता मयत चंद्रभागा शिंदे या महिलेला राहत्या घरी जीवंत पेटवून दिले. तिला उपचारासाठी शासकीय रूग्णालय नांदेड येथे दाखल केले असता तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. विवाहितेला जीवंत जाळून खूप केल्याच्या प्रकारामुळे वापटी येथे खळबळ उडाली आहे.
फिर्यादी नाना पौळ (रा. कान्हा ता.महागाव जि.यवतमाळ) यांच्या तक्रारीवरून कुरूंदा पोलीस ठाण्यात आरोपी पती संभाजी शिंदे, सासरा गणेशराव शिंदे, सासू शालिनी शिंदे, चुलत सासू ज्योती शिंदे (रा.वापटी), संगीता कदम (रा.सती पांगरा) या पाच जणाविरूद्ध कलम ३०२, ४९८ (अ), ३२३,३४ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पती संभाजी शिंदे याला कुरूंदा पोलिसांनी अटक केली असून चार जण अद्याप फरार आहेत. मयत विवाहितेचे माहेर यवतमाळ जिल्ह्यातील कान्हा ता. महागाव येथील आहे. घटनास्थळी कुरूंदा पोलीस ठाण्याचे सपोनि शंकर वाघमोडे यांनी भेट देवून घटनेचा पंचनामा केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास फौजदार प्रशांत भुत्ते हे करीत आहेत.