- हबीब शेखऔंढा नागनाथ ( हिंगोली ): देवदर्शनासाठी कर्नाटक राज्यातील भाविक घेऊन निघालेल्या बसने औंढा ते वसमत महामार्गावरील वगरवाडी जवळ अचानक पेट घेतला. प्रसंगावधान राखत चालकाने वेळीच बस थांबवली. त्यानंतर आतील सर्व ५० प्रवासी वेळीच बाहेर पडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, यात्रेकरूंचे सामान आणि रोख रक्कम जाळून खाक झाली.
कर्नाटक राज्यातील जामकंडी आसंगी गाव जिल्हा विजापूर येथून काशी, मथुरा, हरिद्वार, काटमांडू आदी ठिकाणी धार्मिक पर्यटनासाठी भाविकांना घेऊन एक खाजगी बस आज हिंगोली जिल्ह्यात दाखल झाली. दुपारी ४ वाजेच्या सुमारास औंढा नागनाथ- वसमत -परभणी राज्यमहामार्गावरील वगरवाडी जवळ बसच्या (क्रमांक एम एच ०४ जी पी १२९७) केबिनमधील गिअर बॉक्स मधून अचानक धुराचे लोट यायला सुरुवात झाली. चालकाने प्रसंगावधान राखत बस रोडच्या बाजूला उभी करून सर्व यात्रेकरूंना बाहेर उतरायला सांगितले. बसमध्ये सगळीकडे धूर पसरला होता. यामुळे घाबरलेल्या भाविकांनी बसच्या दारातून तर काहींनी खिडकीतून बाहेर उड्या घेतल्या. त्यामुळे जीवीतहानी टळली. राज्यरस्त्यावर बस ने पेट घेतल्यामुळे दोन्ही बाजूला जवळपास एक तास ट्रॅफिक जाम झाली होती.
भाविकांचे पैसे,सामान जळून खाकघटनेची माहिती मिळताच औंढा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जी एस राहिरे यांनी अग्निशामक दलाला पाचारण केले. परंतु क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केले. बंब येईपर्यंत बस पूर्णतः जळून खाक झाली होती. बसमध्ये जेवणाचे साहित्य तसेच गॅस सिलेंडर असल्याने आग आटोक्यात आली नाही. परिणामी प्रवासी भाविकांचे रोख रकमेसह संपूर्ण साहित्य भस्मसात झाले. यावेळी वाहतूक नियंत्रणासाठी पोलिस वाहतूक विभागाचे पोलिस उप निरीक्षक शैलेश मुदिराज, सहाय्यक पोलिस उप निरीक्षक खायमोद्दीन खतीब आदींची उपस्थिती होती.