लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मराठा आरक्षण संदर्भात २४ जुलै रोजी सकाळपासूनच आंदोलन सुरू होते. अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यामुळे हिंगोली डेपोतून मंगळवारी सकाळपासून एकही बस धावली नाही. सर्व बसेस रद्द केल्याची माहिती आगारप्रमुख बी. बी. झरीकर यांनी दिली.अचानक बससेवा बंद झाल्याने मात्र प्रवाशांची एकच तारांबळ उडाली. तर लांब पल्ल्यावरील बसेसेवा मागील दोन दिवसांपासून बंदच आहे. २४ जुलै रोजी जिल्हाभरात बंदची हाक देण्यात आली. त्यानंतर विविध मार्गावरून बसेस धावल्या नाहीत. त्यामुळे बसस्थानक परिसरात शुकशुकाट दिसून आला. शाळकरी मुलांचीही बससेवा बंदमुळे फजिती झाली. हिंगोली आगारात एकूण ५४ बसेस आहेत. परंतु मंगळवारी आंदोलनामुळे एकही बस स्थानकातून सोडली नाही. सुरू असलेल्या आंदोलनामुळे काही दिवसांपूर्वीच हिंगोली आगाराच्या तीन बसेस आंदोलकांनी फोडल्या होत्या. यामध्ये जवळपास एक लाखांचे बसचे नुकसान झाले होते. खाजगी वाहनेही बंद होती. बससेवा आणि खाजगी वाहने ट्रॅव्हलसही बंद असल्यामुळे प्रवासी रेल्वेस्थानकाकडे धाव घेत होते. त्यामुळे रेल्वेस्थानक परिसरात प्रवाशांची एकच गर्दी झाल्याचे चित्र होते.
बससेवा ठप्प, प्रवाशांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 12:26 AM