लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील बसस्थानकाच्या नवीन इमारतीचा प्रश्न मंजुरी स्तरावर मार्गी लागल्यानंतर १५ आॅगस्ट रोजी भूमिपूजनही पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात कामाला प्रारंभ झाला नाही. बसस्थानकाची जुनी इमारत पाडल्यानंतर पर्यायी व्यवस्थेसाठी स्थानक परिसरातच लोखंडी शेड उभारले जात आहे.मागील अनेक वर्षांपासून हिंगोली बसस्थानकाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी लागला असला तरी प्रत्यक्षात मात्र बांधकामास अद्याप प्रारंभ झाला नाही. आस्थापनेअंतर्गत येणारी दुकाने व हॉटेलचालकांनाही याबाबत नोटिसा दिल्या होत्या. साडेचार कोटी खर्च करून या ठिकाणी बसस्थानकाची टोलेजंग इमारत उभी राहणार आहे. इमारत बांधकाम जागेचे भूमिपूजनही झाले आहे. परंतु पुढील प्रक्रिया संथगतिने सुरू असल्याचे दिसून येत आहे. बांधकाम कालावधीत प्रवाशांची गैरसोय होऊ नये, म्हणून पर्यायी जागेत शेडची उभारणी केली जात आहे.जूनच्या पहिल्या आठवड्यात जुने बसस्थानक पाडून त्या ठिकाणी नवीन सुसज्ज इमारत उभी करण्याची तयारी सुरू होती. परंतु आॅगस्टमध्ये भूमिपूजन झाल्याने बांधकामास लवकर सुरूवात होईल अशी नागरिकांना अपेक्षा होती. परंतु त्याचा पत्ता नाही. हे काम झाल्यास हिंगोलीकरांना आगारातील विविध सुविधांचा लाभ घेता येणे शक्य होणार आहे.अडचणच कळेना : प्रशासनही गप्पचबसस्थानकाच्या पुनर्बांधणीचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून अडगळीत पडला होता. प्रथम बांधकाम कोणत्या जागेवर करायचे याचेच नियोजन नव्हते. आता सगळेच निश्चित असूनही काम होत नाही. त्यामुळे आता अडचण काय आहे? असा सवाल प्रवाशांतून केला जात आहे.बसस्थानकाचे काम सुरू करण्यासाठी पर्याय म्हणून उभारण्यात येत असलेल्या शेडचे काम अतिशय संथगतीने होत आहे. याची जागाही दोनदा बदलल्याने नियोजनशून्य कारभार समोर येत आहे.
बसस्थानक इमारत भूमिपूजनानंतर ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 1:11 AM