हिंगोली : कोरोना आजार ओसरत चालला असल्याचे पाहून शासनाने ६ जूनपासून लांबपल्ला व साध्या बसेस सुरू करण्याच्या सूचना केल्या आहेत. १० जुलै ते १४ जुलैदरम्यान साध्या बससेचा २९ हजार ६० किलोमीटर एवढा प्रवास झाल्याची माहिती एस. टी. महामंडळाच्या हिंगोली आगाराने दिली.
हिंगोली आगारातून हिंगोली-पुणे २ बसेस आणि हिंगोली-सोलापूर १ अशा दोन लांब पल्ला बसेस दिवसासाठी सोडण्यात आलेल्या आहेत. या बसेसचा ११ हजार ५७० किलोमीटर प्रवास झाला आहे, तर हिंगोली-पुणे, हिंगोली-सोलापूर, हिंगोली-कोल्हापूर अशा तीन रातराणी बसेस आहेत. या बसेसचा प्रवास १० हजार ३४० किलोमीटर एवढा झाला आहे.
कोरोना ओसरत चालला असला तरी, कोरोनाचे रुग्ण दिवसागणिक आढळून येत आहेत. त्यामुळे सर्व चालक व वाहकांना प्रवासादरम्यान मास्क घालण्याच्या सूचना दिल्या आहेत. जे चालक-वाहक प्रवासादरम्यान मास्क घालणार नाहीत, अशांची ड्युटी बंद करण्यात येईल, अशी सूचनाही देण्यात आली आहे.
लांब पल्ल्यांपेक्षा हिंगोली जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या परभणी, नांदेड, अकोला, वाशिम, रिसोड या जिल्ह्यांसाठी प्रवासी संख्या अधिक मिळत आहेत. त्यामुळे एस. टी. महामंडळाच्या उत्पन्नात भर पडत आहे. गत पाच दिवसांत साध्या बसेसचा २९ हजार ६० किलोमीटर एवढा प्रवास झाला आहे.
कोरोना काळात आंतरराज्य बससेवा बंद ठेवण्यात आली होती. आठ दिवसांपूर्वी हिंगोली-हैदराबाद ही बससेवा प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू केली आहे. पाच दिवसांत या बसचा प्रवास २ हजार २४० किलोमीटर झाला, तर मध्यम लांब पल्ल्यांच्या औरंगाबाद, लातूर या बसेस आहेत. या बसेसचा ६ हजार ३९० किलोमीटर एवढा प्रवास झाला.
बस स्वच्छ करूनच आगारातून काढली जाते...
शासनाच्या निर्देशानुसार हिंगोली आगाराने लांब पल्ला, रातराणी, आंतरराज्य, मध्यम आणि साध्या बसेस सुरू केल्या आहेत. शासनाची सूचना आली नसल्यामुळे ग्रामीण भागात अजून तरी बस जाऊ दिली नाही. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे आगारातून सर्व बसेस स्वच्छ करूनच बाहेर काढल्या जातात. प्रवाशांनी मास्क घातला नसेल, तर त्यांना बसमध्ये घेऊ नका, अशा सूचनाही वाहकांंना दिल्या आहेत.
- संजयकुमार पुंडगे, स्थानकप्रमुख, हिंगोली