गोरेगाव (जि. हिंगोली) : सतत पीकहानी व दुष्काळी परिस्थितीमुळे हैराण झालेल्या गोरेगाव परिसरातील शेतकऱ्यांकडून अवयव विक्रीला काढण्यात आले आहेत. आता कुटुंब उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न उपस्थित करत संबंधित शेतकऱ्यांनी ‘आमचे रक्त विकत घ्या आणि बदल्यात पोट भरण्यासाठी गहू, तांदूळ, तेल अन्नधान्य द्या,’ अशी मागणी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्ह्यात निसर्गाच्या अवकृपेमुळे सतत तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. प्रचंड पीकहानी होऊनही पीक विम्याचा एक रुपयाचाही परतावा मिळाला नाही. कुठलीच शासकीय मदत मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी सरकारकडे रक्त काढून घ्या, पण अन्नधान्य द्या, अशी मागणी केली आहे.
वारंवार आंदोलने करूनही शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत शासनाकडून तोंडाला पाने पुसली जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर अवयव, रक्त विक्रीची वेळ आली आहे. - गजानन कावरखे, शेतकरी, गोरेगाव, जि. हिंगोली
परिणामी शेतकरी कंगाल झाला असल्याने आता परिवाराचा उदरनिर्वाह भागवायचा कसा? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. हा मुद्दा मांडत गोरेगावसह परिसरातील शेतकऱ्यांकडून आता रक्त विक्रीचा निर्णय घेण्यात आला आहे.