कळमनुरी ( हिंगोली ) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत नाफेडमार्फत २ फेब्रुवारी पासून आतापर्यंत ७ हजार ७०० क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली असल्याची माहिती सचिव बी.एम. जाधव यांनी दिली.
येथील कृउबामध्ये जवळपास ८०० शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी बाजार समितीत नोंदणी केली होती. तुरीला ५ हजार ४५० रुपये हमीभाव दिल्या जात आहे. आॅनलाईन नोंदणी केल्यानंतर तूर बाजार समितीत विक्रीसाठी आणण्यासाठी बाजारसमिती मार्फत मोबाईलवर मेसेज पाठविला जातो. त्यानंतर सातबारावरील पेरापत्रकानुसार हेक्टरी १० क्विंटल प्रमाणे तुरीची विक्री शेतकऱ्यांना करता येते.
आॅनलाईन तूर विक्रीची रक्कम एका महिन्याच्या आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा होणे अपेक्षित होते. परंतु आतापर्यंत फक्त २० ते २५ शेतकऱ्यांना आॅनलाईन रक्कम मिळाल्याचे बाजार समितीतून सांगण्यात आले. रक्कम मिळण्यासाठी शेतकरी बाजार समितीच्या चकरा माराव्या लागत आहेत. दररोज ४०० ते ५०० क्विंटल तूर बाजार समितीत विक्रीसाठी शेतकरी विक्रीसाठी घेऊन येतात. दरम्यान, २ एप्रिल रोजीही तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांनी वाहनांच्या रांगा लावल्या होत्या. सध्या मात्र तूर विक्रीसाठी आणण्याची गती मंदावली असल्याचे जाधव यांनी सांगितले.