लोकमत न्यूज नेटवर्क हिंगोली : तालुक्यातील केसापूर येथील एका शेतकऱ्यास ऑनलाइन म्हशी खरेदी करणे एकाला चांगलेच महागात पडले. यात दाेन लाख २६ हजारांची फसवणूक झाली. याप्रकरणी एका भामट्याविरुद्ध नर्सी नामदेव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
केसापूर येथील गणेश भानुदास टेकाळे यांनी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करण्यासाठी म्हशी खरेदी करण्याचा निर्णय घेतला. यासाठी ते जास्त दूध देणाऱ्या म्हशीची माहिती घेत होते. ऑनलाइन माहिती घेत असताना काही म्हशीचे फोटो त्यांना आवडले. म्हशीचे फोटो पाहून दोन म्हशी खरेदी करण्यासाठी त्यांनी समोरील व्यक्तीस संपर्क साधला. त्यानुसार १ ते ५ नोव्हेंबर या कालावधीत दोन म्हशी खरेदीसाठी फोन पे व ऑनलाइन सेवा केंद्राद्वारे पुण्य प्रतापसिंग नावाच्या व्यक्तीच्या नंबरवर दाेन लाख २६ हजार ३२४ रुपये पाठविले. मात्र, पैसे पाठवूनही म्हशी देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने फसवणूक झाल्याचे टेकाळे यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. याप्रकरणी पुण्य प्रतापसिंग नावाच्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद झाला.