हिंगोली/कळमनुरी : कळमनुरी येथे एका जमावाने चार बसची तोडफोड केली तर एक बस पेटवून दिल्याने शहरात तणाव निर्माण झाला आहे. सदर घटना २० डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते ११ वाजेदरम्यान घडली आहे. या घटनमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून पोलीस अधीक्षक योगेश कुमार आणि अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांनी घटनास्थळी जाऊन भेट दिली.
सविस्तर माहिती अशी की कळमनुरी येथील आगारातून सकाळी ७.३० वाजता सालवाडीकडे जाणारी बस जमावाने भाजीमंडई परिसरात अडविली. बसमध्ये १५ प्रवासी होते. बस अडवून १० ते १५ जणांच्या जमावाने अचानक दगडफेक करण्यास सुरूवात केली व बसच्या काचा फोडल्या. तर काही जणांनी बस पेटवून देण्याचा प्रयत्न केला असता यात बसच्या पाच सीट (आसन खुर्च्या) पुर्णत: जळाल्या आहेत. त्यानंतर या जमावाने कळमनुरी येथील जुने बसस्थानकाजवळ कळमनुरी-सिरसमकडे जाणाऱ्या बसवर दगडफेक केली.
या बसमध्ये १८ प्रवासी होते. त्यानंतर रूपूर येथून कळमनुरीकडे येणाऱ्या बसचे बिएसएनएलच्या कार्यालयाजवळ काचा फोडल्या. यावेळी बसमधील चालक आणि वाहकाने तात्काळ प्रवाशांना बसमधून उतरविले. त्यानंतर सकाळी ११.५ वाजता कळमनुरी ते पांगरा शिंदे जाणारी बसच्या लमाणदेव मंदिराजवळ काचा फोडल्या. या घटनमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून कळमनुर येथील बाजापेठ कडकडीत बंद आहे. तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलीस प्रशासनाने कडोकोट बंदोबस्त ठेवला असून तोडफोड झालेल्या बसेस सर्व ठाण्यात उभ्या केल्या आहेत. त्यानंतर शहरातील शाळाही सोडून देण्यात आल्या. बसची तोडफोड करताना दगडफेकीत दोघेजण जखमी झाले आहेत. तर बससेवा बंद करण्यात आली आहे. दरम्यान कळमनुरीत कडेकोट बंदोबस्त असून पोनि रंजीत मोहिते, सपोनि रोयलवार, फौजदार ज्ञानोबा मुलीगीर, फौजदार शिवसांब घेवारे यांच्यासह मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
हिंगोलीत मानव विकासची बस फोडलीकळमनुरी येथील घटनेनंतर सकाळच्यासुमारास हिंगोली आगारातील मानव विकास बसच्या काही जणांनी काचा फोडल्याने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर सेनगाव येथे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.