लोकमत न्यूज नेटवर्कसेनगाव: तालुक्यात अवैध व्यवसायांविरुद्धची मोहीम काही दिवसांपासून पूर्णत: थंडावल्याने पुन्हा एकदा तालुक्यातील सर्वच भागात अवैध दारू विक्री, जुगार, मटका सह अन्य व्यवसायिक सक्रिय झाले असून प्रभावी पोलीस कारवाईची गरज आहे.तालुक्यात पुन्हा एकदा अवैध व्यवसाय जोमात सक्रिय झाले आहेत. मध्यतंरी तालुक्यात स्थानिक गुन्हे शाखेसह स्थानिक पोलीस ठाण्याचा वतीने कारवाईची धडक मोहीम सुरु होती. त्यामुळे तालुक्यात अवैध व्यवसायिकांनी गाशा गुंडाळला होता. कधी नव्हे, एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय नव्याने रुजू झालेले पोलीस अधीक्षक योगेशकुमार यांच्यामुळे बंद झाले होते. पंरतु या कारवाईला कोळसा प्रकरणाने गालबोट लागले. पोलीस वाहनात एका आरोपीचा झालेला मृत्यू व त्यात कुचराई करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पाच पोलीस कर्मचाºयांवर झालेली कारवाईचा परिणाम अवैध व्यवसायाचा कारवाईवर होताना दिसत आहे. यामुळे इतर पोलीस कर्मचारी अवैध व्यवसायावर कारवाई करण्यास धजावत नसल्याचे चित्र दिसत आहे. तर अवैध व्यवसायाला पाठबळ देणारा तालुक्यातील काही पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांनी या कारवाईचा बागूलबुवा उभा करीत अवैध व्यवसायाला मार्ग तर मोकळा करून दिला नाही ना? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेनंतर प्रभावी स्वरूपाची एकही कारवाई झाली नसल्याने शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक गावात अवैध दारू विक्री पुन्हा जोमात सुरू झाली आहे.या अवैध दारू विक्रेत्यांना द्वारपोच मालाचा पुरवठा होत आहे. पानकनेरगाव, साखरा, पुसेगाव, कापडसिनगी, आजेगाव ,सेनगाव आदी परिसरात पुन्हा मटका, जुगार अड्ड्यांनी आपले बस्थान बसविले आहे. असे असताना या अवैध व्यवसायांवर कारवाईचे धाडस स्थानिक पोलीस दाखवताना दिसत नाहीत. सेनगाव येथील पोलीस ठाण्याने अवैध व्यवसायावर कारवाई करण्याचे सोडून रात्रीच्या दरम्यान अवैध वाळू वाहतूक करणाºया वाहनांच्या कारवाईवर आपले विशेष लक्ष केंद्रित केले आहे. सेनगाव पोलिसांची रात्रीची गस्त ही शहरात होण्याऐवजी वाळू वाहतुकीची चोरी होणाºया मार्गाने होताना दिसत आहे.एकंदर कोळसा प्रकरणानंतर अवैध व्यवसायावर पोलीस कारवाईची संख्या घटली असल्याने अवैध व्यवसाय पुन्हा सक्रिय झाले आहेत. या घटनेमुळ जणू त्यांना आता अभयच मिळाल्याचे चित्र असून कारवाईची गरज आहे.
मोहीम थंडावताच अवैध धंदे जोमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 12:40 AM