कळमनुरी (जि. हिंगोली): तालुक्यातील कोंढूर शाळेतील शिक्षक शंकर लेकूळे यांची समायोजन या पद्धतीने बदली केली आहे. परंतु सदरची बदली रद्द करावी, या मागणीसाठी कोंढूर येथील पालक व विद्यार्थ्यांनी १ मार्च रोजी गटशिक्षणाधिकारी कार्यालयातच शाळा भरविली.
तालुक्यातील कोंढूर शाळेतील शंकर लेकुळे हे शिक्षक सन २०२२-२३ च्या संचमान्यतेनुसार शाळेवर अतिरिक्त ठरले आहेत. त्यामुळे त्यांचे समायोजन २९ फेब्रुवारी रोजी शिक्षण विभागाने सांडस येथील शाळेत केले आहे. लेकुळे यांची समायोजनाने झालेली बदली रद्द करावी, यासाठी कोंढूर येथील पालक व विद्यार्थी गटशिक्षणाधिकारी कार्यालयात आले. यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांची कार्यालयातच शाळा भरवून बदली रद्द करा व कोंढूर येथील शाळेत पुन्हा पाठवा, अशी मागणी केली.
शिक्षक लेकुळे हे शाळेत चित्रकला, वर्ग सजावट, शालेय खेळाद्वारे पाठांतर, इस्त्रो भेट, संगणक साक्षरता, विषयनिहाय कार्यशाळा, आकाश निरीक्षण, स्वच्छता मोहीम आदी उपक्रम राबवितात. त्यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढली आहे. या शिक्षकांना पुन्हा कोंढूर येथील शाळेत पाठवा, अशी मागणी पालकांनी केली. यावेळी विनोद बांगर, विठ्ठल पतंगे, मारोती पतंगे, पांडुरंग भुरके, शारदा पवार, प्रसाद पतंगे, पंकज पतंगे, भागवत पतंगे, भुजंगराव पतंगे, सुधाकर पतंगे, अनिल पतंगे आदींची उपस्थिती होती.