हिंगोली : एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित जिल्ह्यातील ४९५ ग्रामपंचायतीमधील ४ हजार ३५ सदस्य निवडीसाठी २३ डिसेंबरपासून अर्ज सादर करण्यास सुरुवात होणार आहे. या निमित्त निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतीमधील वातावरण तापले असून मोर्चेबांधणीला गती आली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने या संदर्भात निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून त्यानुसार २३ ते ३० डिसेंबर या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी तीन या वेळात नामनिर्देशनपत्रे भरली जाणार आहेत. तर ३१ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजल्यापासून छाननी संपेपर्यत नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्यात येणार आहे. तसेच ४ जानेवारी दुपारी ३ वाजेपर्यत नामनिर्ददेशनपत्र मागे घेण्यात येणार आहेत. ४ जानेवारी रोजीच दुपारी तीन वाजेनंतर निवडणूक चिन्ह व निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. १५ जानेवारी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळात मतदान घेण्यात येणार आहे.
१८ जानेवारी रोजी तहसीलदारांनी निश्चित केलेल्या ठिकाण व वेळेनुसार मतमोजणी होणार आहे. २१ जानेवारीपर्यत मतमोजणीनंतर जिल्हाधिकारी निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करणार आहेत.