हिंगोली : तालुक्यातील घोटा येथील सज्जाच्या तलाठयाने तक्रारदाराकडून तडजोडीअंती पाच हजार रुपये स्वीकारण्याची सहमती दर्शवली होती. परंतु तलाठ्यास संशय आल्याने त्याने रक्कम स्वीकारली नाही. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या तक्रारीवरून हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात अखेर 28 मे रोजी उशिराने गुन्हा दाखल झाला.
हिंगोली तालुक्यातील केसापूर येथील तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती की घोटा येथील सजाचे तलाठी गवई केसापूर शेत शिवारातील गट क्रमांक 291, 292, 302, 307 मधील शेताचा त्यांचे आई व बहिणीचे हक्क सोड पत्र प्रमाणे जमिनीचा फेर तक्रारदार व त्यांच्या भावाच्या नावानी घेऊन तसा सातबारा बनवून देण्यासाठी सात हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडी अंती लाचेची रक्कम रुपये 5000 देण्याचे ठरले. सदर तक्रारीची पडताळणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे हिंगोली येथे 28 मे रोजी पडताळणी करण्यात आली. परंतु तलाठी गवई यांना संशय आल्यामुळे त्यांनी सदर रक्कम स्वीकारण्यास सहमती दिली नाही. त्यामुळे गवई यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन हिंगोली ग्रामीण येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, पोलीस उपअधीक्षक हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, पोउपनि बुरकुले, पोहेका विजयकुमार उपरे, पोना संतोष दुमाने, ज्ञानेश्वर पंचलिंगे, तानाजी मुढे, प्रमोद थोरात. विनोद देशमुख अविनाश किर्तनकार आदींनी केली.