हिंगोली : नायलाॅन मांजा विक्री व वापरावर जिल्हा प्रशासनासह पोलीस विभागाच्या वतीने बंदी घालण्यात आली आहे. तरीही छुप्या मार्गाने शहरातील जवळपास दहा ते पंधरा दुकानांमध्ये मांजा विक्री करण्यासाठी ठेवल्याचे आढळून आले. गतवर्षी मांजामुळे १५ जण जखमी झाल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले.
शहरातील कापड गल्ली, अकोला बायपास, पेन्शनपुरा, बुरूड गल्ली, महावीर चौक आदी ठिकाणी पतंगांची दुकाने थाटली आहेत. शहरात जवळपास २० दुकाने पतंगांची असून दहा दुकानांमध्ये चायनीज मांजा विक्रीसाठी असल्याचे पाहायला मिळाले. मकर संक्रांत जवळ येऊ लागल्याने पतंगालाही चांगलीच मागणी वाढली आहे. १० रुपयांपासून १५० ते २०० रुपयांपर्यंत विक्रीला ठेवले आहेत. दुसऱ्याचा पतंग कापण्यासाठी मांजा वापरला जात असूनही तो छुप्या मार्गाने खरेदी केला जात आहे. हा मांजा ५० ते १०० रुपये ग्रॅम प्रमाणे विकला जात आहे. एकदम घेतल्यास ३०० रुपयांना पॅक मिळत आहे. यासाठी लागणाऱ्या चक्रीची किंमतही ३० रुपयांपासून १०० रुपयांपर्यंत आहे. पतंगाचा मांजा वाहनाला आडकून वाहनाचे अपघात होतात; परंतु तसे काही अपघात झाले नाहीत, असे हिंगोली शहर व ग्रामीण पोलिसांनी सांगितले. बंदी असतानाही काही दुकानदार छुप्या मार्गाने मांजाची विक्री करीत आहेत.
शहरात कोणाकडे मांजा आहे याची शोधमोहीम पोलिसांनी सुरू केली. पतंग विक्रेत्याकडे मांजा आढळून आल्यास त्या दुकानावर लगेच कारवाई केली जाईल, असे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले.
मकर संक्रांत आली की, पतंग उडवायला सुरुवात होते. खरे पाहिले तर पतंगाचा उल्लेख शास्त्रात कुठेच नाही. तरीही त्याला मकर संक्रांतीला जोडून तो उडविण्याची प्रथा काही वर्षांपासून सुरू केली. त्यामुळे पक्ष्यांना मात्र जीव गमवावा लागतो.
- गजानन धाडवे, पक्षीमित्र
मांजामुळे १३ पक्षी मृत्युमुखी
पतंगाला वापरल्या गेलेल्या मांजामुळे गतवर्षी १३ पक्षी गतप्राण झाले. काहींचे पंखही तुटले. उंच उडणाऱ्या पतंगामुळे जास्त करून घार, करकोचा, कबुतर, इबीस (लाल डोकेवाला) या पक्ष्यांना इजा पोहोचू शकते. पक्ष्यांचा जीव वाचविण्यासाठी पतंग मोकळ्या जागी उडविणे गरजेचे आहे.
मांजा विक्री व वापरावर जिल्हा प्रशासनासह पोलीस विभागाच्या वतीने बंदी घालण्यात आली आहे. जर कोणीही मांजाची विक्री करीत असल्याचे आढळून आल्यास त्या दुकानावर तसेच मांजाची विक्री करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
- पंडित कच्छवे, पोलीस निरीक्षक, शहर, हिंगोली
तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल
मकर संक्रांत १४ दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे आतापासून शहरात पतंगांची दुकाने गल्लोगल्ली सजली गेली आहेत. पतंगासाठी वापरल्या जाणाऱ्या मांजाला बंदी आहे. कारण त्यामुळे इजा पोहोचू शकते. तेव्हा कुठेही चायनीज मांजा आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून त्याच्यावर नियमाप्रमाणे गुन्हा दाखल केला जाईल, असे हिंगोली शहर, ग्रामीण पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले.