हिंगोली शहराजवळील लिंबाळा मक्ता येथील वजन-काटा परिसरात २०१५ मध्ये शेख फारूख शेख रफीक यांनी ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला उभा करून ते पाणी आणत होते, तर त्यांचे वडील व अन्य एक ट्रॅक्टरवर बसून होते. याचवेळी विजय रमेश गादेकर (रा. दाभा, ता. मंगरूळपीर, जि. वाशिम) याने आपल्या ताब्यातील टेम्पो भरधाव व निष्काळजीपणे चालवून या ट्रॅक्टरला धडक दिली. यात शेख फारूख शेख रफीक यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. याप्रकरणी शेख फारूख शेख रफीक यांच्या फिर्यादीवरून विजय गादेकर याच्याविरुद्ध हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
सहायक पोलीस उपनिरीक्षक व्ही. एस. गंगावणे यांनी या प्रकरणाचा तपास करून २३ डिसेंबर २०१५ रोजी गु्न्ह्यातील कागदपत्रे न्यायालयात सादर केली होती. हे प्रकरण प्रथम श्रेणी कोर्ट २ रे चे न्यायदंडाधिकारी व्ही. व्ही. जोशी यांच्यासमोर चालले. यावेळी सरकार पक्षातर्फे ५ साक्षीदार तपासण्यात आले. यात साक्षीदाराची साक्ष महत्त्वाची ठरली. २४ सप्टेंबर रोजी न्यायदंडाधिकारी व्ही. व्ही. जोशी यांनी या प्रकरणाचा निकाल सुनावला. त्यावरून आरोपी विजय रमेश गादेकर यास कलम २७९, ३३७, ३३८ भादंविमध्ये प्रत्येकी १ हजार रुपये याप्रमाणे ३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच दंड न भरल्यास १५ दिवस साधी कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. कलम ३०४ (अ) भादंवि मध्ये ७ हजार रुपये दंड व २ महिने सश्रम कारावास, तसेच दंड न भरल्यास १ महिन्याच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. कलम १३४/ १८७ मोटार वाहन कायद्यानुसार १०० रुपये दंडाची शिक्षा तसेच दंड न भरल्यास १५ दिवस साध्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.
सरकारी अभियोक्ता म्हणून ॲड. अनिल इंगळे यांनी, तर पैरवी अधिकारी म्हणून किशन डुकरे यांनी काम पाहिले.