हिंगोली : विविध मोबाईल कंपन्यांकडून व्हेरिफिकेशन पेंडिंग आहे. २४ तासांत तुमचे सीम कार्ड ब्लॉक होईल, असे मेसेज पाठवून मोबाईलधारकांना फसविण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे मोबाईलवर येणाऱ्या अनावश्यक मेसेजला रिप्लाय देऊ नका, अन्यथा तुम्हीही फसविले जाऊ शकता. प्रत्येकाकडे ॲड्राॅईड मोबाईल आल्याने प्रत्येकजण ऑनलाईन झाला आहे. बहुतांश व्यवहार ऑनलाईन केले जात आहेत. विविध ॲप उपलब्ध झाल्याने काम सोपे झाले असले, तरी धोकाही वाढत आहे. मेसेज पाठवून ओटीपी मागवून फसवणूक केली जात आहे. नेमकी आपली फसवणूक कोण करतंय, हे लवकर समजत नसल्याने फसवणूक झालेलेही पोलिसांत तक्रार द्यायला पुढे येत नाहीत. आता तर व्हेरिफिकेशन पेंडिंग आहे, २४ तासांत सीम कार्ड ब्लॉक होईल, असे मेसेज येत आहेत. सीम कार्ड बंद पडेल, या भीतीने माहिती विचारणाऱ्याला मोबाईलधारक अनावधानाने माहिती देत आहेत. मात्र यात फसवणूक झाल्याचे नंतर समजते. त्यामुळे ग्राहकांनी फेक मेसेज व कॉलपासून सावध राहावे, असे मेसेज आल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी.
सायबरसेलकडे आलेल्या एकूण तक्रारी
२०१९ - ५
२०२० - १६
२०२१ - ३
ॲप डाऊनलोड करण्यापूर्वी सावधान
प्ले स्टोअरवर अनेक ॲप मोफत असतात. ॲप डाऊनलोड करताना मोबाईलधारकांची वैयक्तिक माहिती विचारली जाते. अनेकवेळा आपल्याला मेसेज येतो. अमूक अमूक ॲप डाऊनलोड करा, असे सांगितले जाते. अशावेळी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. ॲपची गरज व त्यातून आपली फसवणूक होणार नाही, याची काळजी घ्यावी.
असा कॉल वा मेसेज आल्यास सावधान
१) आपल्या मोबाईलवर निनावी क्रमांकावरून मेसेज आला, तर याबाबत अधिक जागरूकपणे खातरजमा करावी, त्यानंतरच रिप्लाय द्यावा. बहुतांशवेळा चुकीचे मेसेज व कॉल येतात.
२) व्हेरिफिकेशनच्या नावाखाली विचारण्यात येणारी माहिती, करण्यात येणारा कॉल आपली फसवणूक करणारा असू शकतो. त्यासाठी प्रत्येकाने सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
३) फेक अकाउंटवरून आपल्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न होतो. अशावेळी अनोळखी व्यक्तीसोबत चॅटिंग अथवा मैत्री करणे आपल्याला महागात पडू शकते. हे टाळण्यासाठी दक्ष राहावे.
अशी घ्या काळजी
बीएसएनएल अथवा इतर कंपन्यांकडून सीमकार्ड ब्लॉकसंबंधी मेसेज आल्यास बीएसएनएल कंपनीचे कार्यालय गाठून मेसेजबाबत विचारणा करावी. अन्य कंपनीच्या सीम कार्डबाबत मेसेज आल्यास कस्टमर सेंटरला संपर्क साधून मेसेजबाबत खातरजमा करावी. यातून आपली होणारी फसवणूक टळण्यास मदत होते.
ओटीपीची मागणी करून अथवा फेसबुकवरून फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. तसेच सीम कार्ड ब्लॉकसंबंधी मेसेज आल्यास अशा मेसेजमधूनही फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बँक अकाउंट, आधार कार्ड अथवा इतर वैयक्तिक माहिती मोबाईलवरून कुणालाही देऊ नये.
- उदय खंडेराय, पोनि. स्थानिक गुन्हे शाखा तथा सायबर सेल प्रमुख