लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : वसमत पंचायत समितीच्या सभापतीसाठी आलेली नवीन कोरी करकरीत जीप तब्बल महिन्याभरापासून वापराअभावी झाडाखाली उभी आहे. लाखो रुपयांची गाडी अशी झाडाखाली धूळ खात उभी राहिल्याने हा प्रकार चर्चेचा विषय झाला आहे.जि.प.च्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीसाठी नवीन वाहन देण्यात आले. वसमत पंचायत समिती सभापती, उपसभापतीसाठीही नवीन जीप प्राप्त झाली. वसमत पंचायत समितीत महिन्याभरापूर्वी गाडी दाखलही झाली. मात्र या नव्या गाडीला अद्याप सभापतींनी हातही लावला नसल्याने कोरी गाडी धूळ खात उभी आहे. नव्या वाहनांत फिरण्याऐवजी सभापती त्यांच्या स्वत:च्या गाडीतूनच प्रवास करत असल्याने हा प्रकार चर्चेचा विषय झाला आहे. सभापती नवीन गाडी का स्वीकारत नाहीत, याबाबत तर्कवितर्कही लावल्या जात आहेत. तर जागीच तांत्रिक बिघाडाची भीती आहे.यासंदर्भात गटविकास अधिकारी सुरोसे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सभापती-उपसभापतीसाठी नवे वाहन आलेले आहे. आजपर्यंत सभापती व बिडीओसाठी एकच वाहन होते. आता सभापती, उपसभापतीसाठी स्वतंत्र वाहनाची व्यवस्था झाली आहे. मात्र अद्याप सभापतींनी वाहन वापरण्यास प्रारंभ केला नसल्याचे त्यांनी सांगितले.सभापती चंद्रकांत दळवी यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी मी गेल्या १९ महिन्यांपासून माझे स्वत:चे वाहन वापरत आहे. किरायाच्या घरात राहून किराया भरत आहे. सभापतींना नियमानुसार मिळणाऱ्या सुविधांचा लाभही आम्हाला आजपर्यंत मिळालेला नाही. या संदर्भात सीईओंना पत्र देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सभापतींची जीप धूळखात उभी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 12:23 AM