हिंगोली : केंद्र सरकारने आणलेल्या नवीन मोटार वाहन कायद्याच्या विरोधात वाहनचालकांत संतापचा सूर उमटत असून, या कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी २ जानेवारी रोजी वाशिम- हिंगोली महामार्गावर वाहनचालकांच्यावतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले. चक्काजाममुळे महामार्गावर दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
बेफिकीर वाहने चालवून अपघात व त्यामुळे होणारी जीवितहानी टाळण्यासाठी केंद्र शासनाने मोटार वाहन कायद्यात दुरुस्ती केली आहे. त्यानुसार अपघातानंतर पोलिसांना किंवा प्रशासनाला न कळविता चालक घटनास्थळाहून पळून गेल्यास कठोर शिक्षा, चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाला असेल आणि अपघातानंतर चालक पळून गेल्यास दहा वर्षांचा कारावास व सात लाखांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो, तसेच अपघात झाल्यानंतर चालकाने पोलिसांना कळविले, जखमींची मदत केली तर दंडासह पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते, तसेच अपघातास कारणीभूत चालकावर जामीनपात्र गुन्हा नोंदविण्यात येत होता. आता मात्र अजामीनपात्र गुन्हा नोंदविण्यात येणार आहे.
कायद्यातील या दुरुस्तीविरोधात राज्यभरात ट्रक, टॅंकरचालक रस्त्यावर उतरले आहेत. १ जानेवारीपासूनच याचा परिणाम जाणवत असून, पेट्रोल, डिझेलची टंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्याने इंधनासाठी पंपांवर वाहनांच्या रांगा लागत आहेत.
तर सकाळी ११:३० वाजेपासून हिंगोली - वाशिम महामार्गावरील बासंबा पाटीवर वाहन चालक संघटनांच्या वतीने चक्काजाम आंदोलन करीत रस्त्यावर ठाण मांडले. या आंदोलनामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. यादरम्यान नवीन मोटार कायदा सरकारने परत घ्यावा, या मागणीचे निवेदन पोलिस प्रशासनाला देण्यात आले. यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजीही केली. आंदोलनादरम्यान हिंगोली ग्रामीण ठाण्याच्या पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.
या आंदोलनात शेख सिराज शेख सत्तार, शेख रहेमान, हमीदखाॅ पठाण, सत्तारखाॅ पठाण, शेख मुख्तार, शेख नवाब, स्वप्नील जैस्वाल, पंडित दिपके, संजय राऊत, सय्यद महेबूब, गणेश सोनुने, मारोती शिंदे, शेख जब्बार, साजीदखाॅ, शेख नवाब यांच्यासह ट्रकचालक सहभागी झाले होते.