हिंगोली : येत्या पाच दिवसांत मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
दि. २७ जून ते ३ जुलैदरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची तर किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची तसेच पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यताही हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. सद्य:स्थितीत खरीप हंगाम सुरू असून, पेरणी न केलेल्या शेतकऱ्यांनी पेरणीयोग्य पाऊस झाल्याशिवाय खरिपाच्या पेरणीसाठी घाई करू नये, असेही आवाहन हवामानशास्त्र विभागाने केले आहे.
पेरणीयोग्य पाऊस (७५-१०० मि.मी.) न झालेल्या ठिकाणी शेतकऱ्यांनी कापूस लागवडीची घाई करू नये. कापूस लागवड १५ जुलैपर्यंत, तूर १५ जुलैपर्यंत, मूग, उडीद ७ जुलैपर्यंत, भुईमूग ७ जुलैपर्यंत पेरणी करता येते, असाही सल्ला कृषितज्ज्ञांनी दिला आहे.
खरीप हंगामात पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतर जमिनीत पुरेसा ओलावा असल्याची खात्री शेतकऱ्यांनी करून घेऊनच खरिपातील पिकांची पेरणी करणे योग्य राहील.