हिंगोली : वीज मीटरमध्ये फेरफार केल्यास मोठी किंमत मोजावी लागते. एवढेच काय, मीटर जप्तीचीही कारवाई किंवा मोठा दंड आकारला जाऊ शकतो, असे महावितरणच्यावतीने सांगण्यात आले.
जिल्ह्यात २०१९-२०२० या वर्षात एकूण ९ वीज मीटर्सची महावितरणच्यावतीने तपासणी करण्यात आली होती. तसेच विजेचा अनधिकृत वापर केल्यामुळे एकूण ३५६ वीज ग्राहकांना ३९ लाख ९९ हजार रुपयांचा दंडही ठोठावला होता. यापैकी १२ लाख २८ हजार रुपयांच्या दंडाची याच आर्थिक वर्षात वसुलीही झाली आहे. उर्वरित दंडाच्या रकमेची वसुली करण्याची प्रक्रिया महावितरणचे अधिकारी, कर्मचारी करीत आहेत. नियमानुसार पैसे भरल्यास महावितरण सर्वांनाच वीज देण्यास तयार आहे. परंतु, काही वीजग्राहक मात्र नियमानुसार मीटर न घेता वीजतारांवर आकडे टाकून वीजचोरी करीत आहेत. महावितरणच्या लक्षात ही बाब आल्यास त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई केली जाते. तेव्हा वीज ग्राहकांनी रितसर मीटर घेऊन त्याचे बिल वेळेवर भरावे, असे आवाहनही वीज वितरणने केले आहे.
१२६, १३५ नुसार कारवाई...
तारांवर आकडे टाकून वीजचोरी केल्यास त्या व्यक्तीवर १२६ कलमानुसार कारवाई करून दंड ठोठावण्याची तरतूद आहे. वीज मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी केल्यास त्या व्यक्तीवर १३५ कलमानुसार मोठी कारवाई करत दंड आकारला जातो. एवढेच नाही, तर त्याचे मीटरही जप्त केले जाते. तेव्हा कोणीही मीटरमध्ये छेडछाड करू नये. काही अडचण आल्यास महावितरणच्या लाईनमनशी संपर्क साधावा, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
कधीही होऊ शकते मीटरची तपासणी...
वीज ग्राहकाच्या मीटरची तपासणी केव्हाही केली जाऊ शकते. महावितरणच्या अधिकाऱ्यांना काही संशय आल्यास मीटरची तपासणी करता येऊ शकते. मीटरमध्ये काही बिघाड असल्यास किंवा मीटर रीडिंग बरोबर येत नसल्यास महावितरणला कळवावे. घरबसल्या कोणीही मीटरमध्ये छेडछाड करू नये. केल्यास अंधारात राहण्याशिवाय पर्याय राहणार नाही.
९ वीज मीटरची केली तपासणी...
२०१९-२०२० या वर्षात ९ वीज मीटरची महावितरण कार्यालयाच्यावतीने तपासणी करण्यात आलेली आहे. विजेचा अनधिकृत वापर केल्यामुळे एकूण ३५६ वीज ग्राहकांना ३९ लाख ९९ हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. यापैकी १२ लाख २८ हजार रुपयांच्या दंडाची आर्थिक वर्षात वसुलीही करण्यात आली आहे.
प्रतिक्रिया...
वीज ग्राहकांनी दक्षता घ्यावी....
वीज ग्राहकांनी वीज मीटरमध्ये छेडछाड करू नये. छेडछाड केल्यास कारवाई तसेच दंडही ठोठावला जाऊ शकतो. दुसरीकडे ज्या ग्राहकांकडे वीज बिलापोटी थकबाकी आहे, त्यांनी वेळेवर आपली विजेची थकबाकी भरून महावितरणला सहकार्य करावे. महावितरण कंपनीनुसार वीज मीटर वीज यंत्रणेचा आत्मा आहे.
- रजनी देशमुख, कार्यकारी अभियंता, हिंगोली