औंढा नागनाथ, जि.हिंगोली : तालुक्यातील दरेगाव येथे एका पोल्ट्री फार्म चालकाने कोरोना विषाणूच्या भीतीने ग्राहक कोंबडी खात नसल्याने २१ हजार कोंबड्या खड्ड्यात गाडून टाकल्याची माहिती शासनाला दिली होती. प्रशासनाच्या पडताळणीत मात्र तीन हजार मृत व तीन हजार जिवंत कोंबड्याच गाडल्या व त्यासाठी परवानगी नसल्याचे आढळल्याने औंढा पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
जगदंबा पोल्ट्री फार्मच्या लक्ष्मण जाधव, दुर्गादास राठोड यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमिवर केलेली स्टंटबाजी महागात पडली आहे. कोरोना विषाणूमुळे कोंबडी बाजारपेठेत विक्री होत नाही. तर त्यांना सांभाळण्याचा खर्च होत नसल्याने त्यांनी १२ मार्च रोजी २१ हजार कोंबडी दहा बाय दहाच्या खड्ड्यामध्ये जेसीबीच्या साह्याने जिवंत गाडल्या होत्या. याची माहिती जिल्हाधिकारी, तहसीलदार व पोलीस ठाणे औंढा यांना देण्यात आली. निवेदन देऊन २१ हजार कोंबड्यांचे शासनाने अनुदान द्यावे म्हणून मागणी केली होती.
जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेत पो.नि. वैजनाथ मुंडे यांना चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यावरून मुंडे यांनी १७ मार्च रोजी प्रत्यक्ष पोल्ट्री फार्मवर जाऊन पाहणी केली असता, आठ हजार कोंबड्या जीवंत असल्याच आढळून आले. त्यामुळे कोंबडी उत्पादकांना २१ हजार पक्षी खड्ड्यांमध्ये गाडल्याची खोटी माहिती दिली असे निदर्शनास आले. तर खड्ड्यात जेसीबीच्या साह्याने केवळ ३ हजार जीवंत कोंबड्या व ३ हजार मरण पावलेल्या कोंबड्या गाडल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे. कोंबडी उत्पादकाने शासनाकडून अनुदान मिळावे म्हणून प्रशासनाला खोटी माहिती देत देत अनुदानाची मागणी केली. खड्ड्यांमध्ये विनापरवानगी व हिंसकपणे पक्ष्यांची हत्या केल्याने कोंबडी उत्पादक लक्ष्मण जाधव, दुर्गादास राठोड या दोघांवर चौकशीअंती १७ मार्च रोजी रात्री ११.३० सुमारास गुन्हा दाखल केला आहे.